पंतप्रधान मोदी यांची मालदीवला भेट – नवे राष्ट्राध्यक्ष सोलिह यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

पंतप्रधान मोदी यांची मालदीवला भेट – नवे राष्ट्राध्यक्ष सोलिह यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

माले – चीनचे हस्तक म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचा पराभव करून मालदीवच्या सत्तेवर आलेल्या इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. इथली भारतीय उपस्थिती मालदीवचा प्रवास चीनकडून पुन्हा लोकशाहीवादी भारताच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसत आहे. हा अलिकडच्या काळात चीनला बसलेला आणखी एक धक्का ठरतो.

मालदीवची सत्ता हस्तगत करून राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या अब्दुल्ला यामिन यांनी या देशातील लोकशाही संपविण्याच्या दिशेने पावले टाकली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई व न्यायाधिशांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय यामिन यांनी घेतला होता. यावर मालदीवच्या जनतेकडून प्रतिक्रिया उमटली. काही नेत्यांनी तर भारताने लष्करी हस्तक्षेप करून मालदीवची लोकशाही वाचवावी, असे साकडे घातले होते. तर मालदीवच्या अंतर्गत कारभारात कुणीही लष्करी हस्तक्षेप करू नये, असा इशारा चीनने दिला होता. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यामिन हे चीनचे हस्तक मानले जात होते.

चीनच्या पाठिंब्यावरच यामिन यांनी मालदीवची सत्ता हस्तगत केली होती. त्यांच्या कार्यकाळात मालदीवमध्ये चीनचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले होते. तसेच मालदीवचे भारताबरोबरील पारंपरिक लष्करी सहकार्य यामिन यांनी गोठविण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर सप्टेंबर महिन्यात मालदीवमध्ये निवडणूक पार पडली व यात यामिन यांचा इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. मालदीवच्या लोकशाहीवादी पक्षांनी सोलिह यांच्यामागे आपली ताकद उभी केल्याने त्यांना हे यश मिळाले. त्यांना या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर, भारत, अमेरिका व जगभरातील इतर प्रमुख देशांनी मालदीवमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.

शनिवारी सोलिह यांचा शपथविधी समारोह पार पडला व याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगे देखील उपस्थित होत्या. मालदीवला भेट देण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून मालदीवच्या जनतेला सदिच्छा दिल्या. भारत मालदीवमधील पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा व मनुष्यबळ विकासासाठी नव्या सरकारला सर्वतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही भारताच्या पंतप्रधानांनी दिली.

या भेटीत पंतप्रधान मोदी मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची ही मालदीव भेट राजकीय व सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालदीववर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनने अब्दुल्ला यामिन यांचा वापर करून त्यांच्यामागे आपले सामर्थ्य उभे केले होते. मालदीववरील भारताचा नैसर्गिक प्रभाव संपुष्टात आणून या बेटांचा समुह असलेल्या देशाचा वापर भारताच्या विरोधात करण्याची चीनची योजना होती. मालदीवची लोकशाही संपविल्याखेरीज ते शक्य नसल्याची जाणिव चीनला होती.

म्हणूनच यामिन यांचा वापर करून चीनने मालदीवची लोकशाही संपविण्याचे भयंकर कारस्थान आखले होते. याआधी श्रीलंका, नेपाळ व मलेशिया मध्येही चीनने असे प्रयोग करून भारताची सुरक्षा व हितसंबंधांना हादरा देण्याचा प्रयत्न केला होता. पण मालदीवमध्ये चीनचा डाव उलटला असून लोकशाहीवादी नेते इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा विजय हा चीनसाठी फार मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

दक्षिण आशियाई क्षेत्रात, त्यातही हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचा नैसर्गिक प्रभाव आपल्यासाठी आव्हान असल्याचे चीनचे म्हणणे आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील व्यापारी वाहतूक भारतीय नौदल रोखू शकेल. विशेषतः मलाक्काच्या आखातातून होणारी चीनची इंधनवाहतूक भारताकडून रोखली जाऊ शकते, या भीतीने चीनला ग्रासले आहे. म्हणूनच भारताच्या विरोधात कारवाया करताना, आपण एका मर्यादेच्या बाहेर आक्रमक भूमिका स्वीकारू शकत नाही, याची पुरेपूर कल्पना चीनला आहे. म्हणूनच हिंदी महासागर क्षेत्रात भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने केला जातो.

सध्या तरी चीनचे हे प्रयत्न चीनच्याच अंगावर उलटले असून लोकशाहीविरोधी नेते व शक्तींना बळ पुरविण्याच्या योजनेमुळे चीन दक्षिण आशियात अधिकच बदनाम झाला आहे. त्याचवेेळी भारत हा आपला विश्‍वासू मित्रदेश असल्याची भावना दक्षिण आशियाई देशांमध्ये अधिकच दृढ झाली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info