बैरूत – हिजबुल्लाहचे नियंत्रण असलेल्या लेबेनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्रायली लष्कर शिरल्याचा आरोप लेबेनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेने केला. अद्याप या आरोपाला कुणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून हिजबुल्लाह व इस्रायलकडून एकमेकांना देण्यात येत असलेल्या इशार्यांच्या पार्श्वभूमीवर, लेबेनॉनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या या बातमीचे महत्त्व वाढले आहे. हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबेनॉनच्या सीमाभागातून इस्रायलवर हल्ले चढविण्याची तयारी करीत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. हिजबुल्लाहने यावेळी इस्रायलवर हल्ले चढविले, तर या इराणसमर्थक संघटनेचा कायमचा बंदोबस्त केला जाईल, अशी धमकी इस्रायलने दिली होती.
गोलान टेकड्यांच्या सीमाभागात तैनात असलेल्या इस्रायली लष्करातील सैनिकांच्या पथकाने मंगळवारी लेबेनॉनच्या दक्षिण सीमाभागात घुसखोरी केल्याचा ठपका लेबेनीज वृत्तसंस्थेने केला. दक्षिण लेबेनॉनमधील वझानी हे सीमेवरील गाव ओलांडून इस्रायली सैनिक ‘हसबानी नदी’पर्यंत पोहोचल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला. इस्रायली सैनिकांनी साधारण तासभर या भागाची पाहणी केली, अशी माहिती लेबेनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. दक्षिण लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाहचे तळ आहेत. तसेच या भागात हिजबुल्लाहने इराणच्या साथीने क्षेपणास्त्रांची फॅक्टरी सुरू केल्याचा आरोपही इस्रायलने केला होता.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र फॅक्टरींची माहिती उघड केली होती. या व्यतिरिक्त सिरियामध्ये संघर्ष करीत असलेले इराणचे सैनिक लेबेनॉनच्या सीमाभागातून इस्रायल जवळच्या सीमाभागात दाखल झाले असून त्यांच्याकडे ‘एस-२००’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा असल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. याचा फायदा घेऊन हिजबुल्लाह कधीही इस्रायलवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा इस्रायली नेत्यांनी केला होता.
तर सिरियावर हल्ले चढवून हिजबुल्लाहला शस्त्रास्त्रे मिळू न देण्याचा इस्रायलचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे सांगून इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी आपल्याकडे भरपूर क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचे हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहने जाहीर केले होते. त्याचबरोबर हिजबुल्लाहची क्षेपणास्त्रे इस्रायलच्या प्रमुख शहरांना अचूकतेने लक्ष्य करतील, असा दावा नसरल्लाहने केला होता. इस्रायल व लेबेनॉनमधील या वाढत्या तणावामुळे येत्या काळात तिसरे लेबेनॉन युद्ध पेटेल, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली होती.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात इस्रायल आणि गाझापट्टीतील हमासमध्ये संघर्ष पेटला होता. हमासने इस्रायलवर ४६० रॉकेट्सचे हल्ले चढविल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझावर ६० हून अधिक हवाई हल्ले चढविले होते. इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी झाली असली तरी कोणत्याही क्षणी या भागात नव्याने भडका उडू शकतो. अशा परिस्थितीत लेबेनॉनच्या सीमाभागात इस्रायली सैनिकांनी शिरकाव करून दुसर्या आघाडीवर संघर्षाची तयारी केल्याचे दिसत आहे.
Englishया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |