पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळासारखाच आत्ताही जगभरात संघर्ष सुरू आहे – ब्रिटनच्या लष्करप्रमुखाचा इशारा

पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळासारखाच आत्ताही जगभरात संघर्ष सुरू आहे – ब्रिटनच्या लष्करप्रमुखाचा इशारा

 

लंडन – ‘जगभरात सतत सुरू असलेला संघर्ष पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळाची आठवण करून देतो. तेव्हा देखील महासत्ता बनण्याच्या स्पर्धेतून पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला होता’, असा इशारा ब्रिटनचे लष्करप्रमुख जनरल सर निक कार्टर यांनी दिला. त्याचबरोबर रशिया, चीन, इराण आणि ‘आयएस’पासून आंतरराष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका असून ब्रिटनने आपली शांततेच्या काळातील मानसिकता सोडून युद्धाची तयारी करावे, असे जनरल कार्टर यांनी बजावले आहे. ‘ब्रेक्झिट’वरून ब्रिटनमध्ये राजकीय संघर्ष पेटला असून या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख कार्टर यांनी केलेले हे विधान ब्रिटनला आत्ताच्या काळात अंतर्गत संघर्ष व विसंवाद परवडणारा नसल्याचा संदेश देत आहे. 

ब्रिटनच्या सुरक्षेसमोर मोठी आव्हाने असल्याची जाणीव जनरल कार्टर यांनी करून दिली. हा धोका वाढत असताना ब्रिटनने गाफिल राहून चालणार नाही, अशा शब्दात लष्करप्रमुखांनी ब्रिटनच्या नेत्यांना आवाहन केले. लंडनमध्ये आयोजित केलेल्या लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना जनरल कार्टर यांनी ब्रिटन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोक्यांचा उल्लेख केला. हा धोका टाळण्यासाठी ब्रिटनला अतिप्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रांची आवश्यकता लागणार असल्याचे कार्टर म्हणाले.

‘रशिया, चीन आणि इराण हे महासत्ता होण्यासाठी शक्तीप्रदर्शन करीत आहेत. त्यांच्या लष्करी हालचाली ब्रिटनची सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीसाठी धोकादायक ठरत आहेत. पण केवळ या देशांपासूनच ब्रिटनला धोका ठरतो, असे नाही. ‘आयएस’ आणि युरोपमध्ये निर्वासितांचे लोंढे घुसविण्यासाठी प्रयत्न करणारे गट देखील ब्रिटन व युरोपच्या सुरक्षेसाठी तितकेच धोकादायक आहेत’, असा दावा लष्करप्रमुखांनी केला.

त्याचबरोबर जागतिक स्थिती अनिश्‍चिततेकडे सरकत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. ‘जागतिक स्तरावरील अस्थैर्य आणि सतत बदलणार्‍या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा राजकीय आणि सामरिकदृष्ट्या अतिशय अनिश्‍चित बनला आहे. यामुळे ब्रिटनच्या सुरक्षेसाठी असलेले धोके देखील वेगवेगळे असून त्यांची तीव्रता वाढत चालली आहे’, याकडे जनरल कार्टर यांनी लक्ष वेधले. 1945 नंतर लागू करण्यात आलेल्या जागतिक व्यवस्थेमुळे जगभरात स्थैर्य प्रस्थापित झाले होते. पण निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे ही यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आगामी धोक्यांसाठी ब्रिटनला लष्करी सज्जता ठेवावीच लागेल. त्याचवेळी ब्रिटनमधील जनतेला इतिहास आणि वर्तमानातील परिस्थितीची जाणीव करून द्यावी लागेल, असे जनरल कार्टर म्हणाले. पहिले महायुद्ध कशामुळे घडले, त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते, ब्रिटनने कुणाशी युद्ध केले, याची साधी माहितीही ब्रिटनच्या तरुणपिढीला नसल्याची खंत जनरल कार्टर यांनी व्यक्त केली.

 हिंदी English  

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info