अमेरिका व चीनमधील वाढत्या स्पर्धेतून ‘आर्थिक युद्ध’ भडकेल – चीनच्या माजी अर्थमंत्र्यांचा इशारा

अमेरिका व चीनमधील वाढत्या स्पर्धेतून ‘आर्थिक युद्ध’ भडकेल – चीनच्या माजी अर्थमंत्र्यांचा इशारा

बीजिंग:  ‘अमेरिका व चीनमधील वाढत्या स्पर्धेतून आर्थिक युद्ध सुरू होण्याचा धोका आहे’, असा स्पष्ट इशारा चीनचे माजी अर्थमंत्री लो जिवेई यांनी दिला. गेल्या काही दिवसात अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धावर तोडगा काढण्यासाठी करारावर स्वाक्षर्‍या होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतील महत्त्वाच्या कमिटीचे सदस्य असणार्‍या माजी मंत्र्यांनी नव्या संघर्षाचे संकेत देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
‘अमेरिका व चीनमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चढाओढीचा पुढचा टप्पा आर्थिक युद्ध हा असेल. कायद्याचे लांब हात वापरून केलेली

कारवाई, विविध कारणे पुढे करून विशिष्ट कंपन्यांवर टाकण्यात येणारी बंदी यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश असेल. झेडटीई व हुवेईसारख्या कंपन्यांवरील कारवाईतून हे दिसून आले आहे’, अशा शब्दात जिवेई यांनी दोन देशांमधील नव्या संघर्षाची जाणीव करून दिली.

अमेरिकेला सध्या राष्ट्रवाद व लोकानुनयी धोरणांनी ओलीस धरले असल्याचा दावा करून त्याचा वापर इतरांविरोधात दादागिरी करता यावी याच्या उपाययोजना करण्यात येईल, असा आरोपही चीनच्या माजी अर्थमंत्र्यांनी केला. प्रतिस्पर्धी देशाचा विस्तार रोखण्यासाठी व त्याविरोधात अनेक गोष्टींचा वापर होणार असून हा दीर्घकाळासाठी वादाचा मुद्दा राहील, याकडेही जिवेई यांनी लक्ष वेधले. योग्य पुराव्यांशिवाय घातपात, द्रोहाचे आरोप करण्याची प्रवृत्ती अमेरिकेत बळावेल, अशा शब्दात त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेकडून चीनविरोधात होणार्‍या कारवाया रोखायच्या असतील तर चीनने इतर देशांबरोबर सहकार्य करून पर्यायी व्यवस्थांची उभारणी करायला हवी, असा सल्लाही चीनच्या माजी अर्थमंत्र्यांनी दिला. त्याचवेळी चीनने आपले चलन ‘युआन’चे पूर्ण आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची घाई करू नये व त्यावरील मर्यादित नियंत्रण कायम ठेवावे, असेही जिवेई म्हणाले. चीनच्या माजी अर्थमंत्र्यांनी केलेली ही वक्तव्ये चीन व अमेरिकेत व्यापारयुद्धावरून सुरू झालेला संघर्ष नजिकच्या काळात थांबण्याची शक्यता नसल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारी ठरतात.

अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ व नेत्यांनीही दोन देशांमध्ये होणार्‍या संभाव्य व्यापारी करारातून विशेष साध्य होणार नसल्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करारासाठी पुढाकार घेतल्याचे दाखविले असले तरी अमेरिका कोणत्याही बाबतीत माघार घेणार नसल्याचे त्यांच्या वक्तव्यांमधून वारंवार समोर येत आहे. त्यामुळे अमेरिका व चीनमधील व्यापारी तसेच इतर आर्थिक पातळ्यांवरील संघर्ष थांबणार नसल्याचे दिसते. अमेरिकी यंत्रणांनी चीनच्या कंपन्यांबाबत नुकतेच घेतलेले निर्णयही त्याला पुष्टी देणारे ठरतात.

या पार्श्‍वभूमीवर चीनच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा अमेरिका-चीन दीर्घकालिन संघर्षाचे स्पष्ट संकेत देणारा दिसत आहे.

English  हिंदी

 

 या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info