अस्थिरता आणि मंदीच्या धास्तीने सोन्याच्या दरात उसळी सहा महिन्यातील सर्वोच्च पातळीवर

वॉशिंग्टन/लंडन – अमेरिकेतील राजकीय अस्थिरता व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘स्पॉट गोल्ड’ची किंमत १,२८१ डॉलर्स प्रति औंस अशी नोंदविण्यात आली असून अमेरिकेतील ‘गोल्ड फ्युचर्स’च्या व्यवहारात १,२८३.२० डॉलर्स प्रति औंस अशी नोंद झाली आहे. सोन्याच्या दरांनी घेतलेली ही उसळी सहा महिन्यातील सर्वोच्च दर असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसात अमेरिकेत जोरदार उलथापालथी सुरू असून त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातील माघारीबाबत जाहीर केलेला निर्णय, संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ व ‘शटडाऊन’मुळे जागतिक शेअरबाजारांसह अर्थव्यवस्थेत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिकेसह जागतिक शेअरबाजारांमध्ये विक्रमी घसरण नोंदविण्यात आली.

त्याचे परिणाम कच्चे तेल, चलन व इतर उत्पादनांच्या दरांवर होत आहेत. इंधनाचे दर मंगळवारी तब्बल सहा टक्क्यांनी घसरले असून ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत ५० डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. अमेरिकेतील इंधनाची किंमतही साडेसहा टक्क्यांनी कोसळली असून प्रति बॅरल ४२.५३ डॉलर्सची नोंद झाली आहे. तेलाचे हे दर गेल्या १६ महिन्यातील नीचांक असल्याचे उघड झाले आहे.

अस्थिरता, उलथापालथी, US Shutdown, सोन्याचे दर, व्यवहार, वॉशिंग्टन, लंडन, रशिया

शेअरबाजार, इंधन व चलनांच्या दरात घसरण सुरू असतानाच सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. सोमवारी झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दर १२७१.४० डॉलर्स प्रति औंस असे नोंदविण्यात आले होते. त्यानंतरही सोन्याच्या दरातील वाढ सुरू असून तीन दिवसात दरांमध्ये तब्बल १० डॉलर्सहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या व्यवहारांमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘स्पॉट गोल्ड’ची किंमत १,२८१ डॉलर्स प्रति औंस अशी उसळली आहे. तर अमेरिकेतील ‘गोल्ड फ्युचर्स’च्या व्यवहारात १,२८३.२० डॉलर्स प्रति औंस अशी वाढीची नोंद झाली.

सर्वसामान्य नागरिक व गुंतवणुकदार सध्या फक्त सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पहात आहेत, अशा शब्दात सिंगापूरमधील सोन्याचे विश्‍लेषक ब्रायन लॅन यांनी उसळीचे समर्थन केले. सोन्याच्या बाजारपेठेतील तज्ज्ञांनी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्‍चिततेकडे लक्ष वेधून नजिकच्या काळात सोन्याचे दर १३०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत जातील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने आपल्या अहवालात जगाच्या विविध भागांमधील भूराजकीय तणावांकडे लक्ष वेधले होते. त्याचवेळी, २०१८ सालच्या पहिला सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या मागणीत तब्बल ४२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले होते. २०१८ सालच्या पहिल्या सहा महिन्यात सोन्याची सर्वाधिक खरेदी करणार्‍या देशांमध्ये रशिया, तुर्की, हंगेरी यासारख्या देशांचा समावेश आहे.

 English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info