युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाने संरक्षणतैनाती वाढविल्याचे दावे

- अमेरिकेकडून नवा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाने युक्रेनवरील आक्रमणासाठी सीमाभागातील संरक्षणतैनाती वाढविल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका तसेच युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी हा दावा केला असून रशियन तैनातीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. रशियन जवानांच्या कुटुंबियांना ‘नाईन मन्थ वॉर’च्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त काही पाश्‍चात्य माध्यमांनी दिले आहे.

संरक्षणतैनाती

रशियन संरक्षणदलाची मोठी तैनाती व आक्रमक पवित्रा या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना काहीतरी कारवाई करणे भाग पडेल आणि कदाचित एखादा छोटासा हल्ला करून रशिया मागे जाईल, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले आहे. ‘रशियाच्या लष्करी तुकड्यांनी युक्रेनची सीमा ओलांडली तर ते रशियाचे नवे आक्रमण समजण्यात येईल. या आक्रमणाला अमेरिका व मित्रदेश एकजुटीने चोख प्रत्युत्तर देतील. रशिया मोठे आक्रमण न करता कदाचित सायबरहल्ले व छोट्या मोहिमेच्या रुपात हल्ला चढवू शकतो आणि रशियाच्या या डावपेचांची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना जाणीव आहे. रशियाच्या अशा आक्रमक कारवायांनाही निर्णायक व जशास तसे प्रत्युत्तर मिळेल’, अशा शब्दात प्रवक्त्या जेन साकि यांनी अमेरिकेची भूमिका मांडली. साकि यांचा हा खुलासा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या वक्तव्यावरील स्पष्टीकरण असल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाच्या हालचालींवर चिंता व्यक्त करताना त्याची तुलना दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या अत्यंत तणावपूर्ण घटनांपैकी एक अशी केली. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेन सीमेवर मोठी तैनाती करून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे काहीच न करता मागे फिरणे त्यांना आता शक्य होणार नाही. पुतिन यांना काहीतरी कारवाई दाखवावीच लागेल आणि कदाचित युक्रेनमध्ये छोटा हल्ला अथवा घुसखोरी करून रशिया थांबेल’, असा दावा बायडेन यांनी केला.

बायडेन यांच्या वक्तव्यावर अमेरिकेतील राजकीय वर्तुळासह युक्रेनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना हल्ल्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची नाराजी युक्रेनमधील अधिकार्‍यांनी दिली. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर्सनी बायडेन यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, रशियाने युक्रेन सीमेनजिकची लष्करी तैनाती अधिक वाढविल्याचे समोर येत आहे.

अमेरिकी तसेच युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी रशियाच्या नव्या तैनातीची माहिती दिली आहे. रशियाने छोट्या पल्ल्याची इस्कंदर क्षेपणास्त्रे, रणगाडे, तोफा, सशस्त्र वाहने, रॉकेट लॉंचर्स युक्रेन सीमेनजिकच्या तळांवर हलविले आहेत. रशिया व बेलारुस तसेच बेलारुस व युक्रेन सीमेनजिकही तैनाती करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या तैनातीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. रशियाने ही तैनाती बेलारुसबरोबरील सरावाची तयारी असल्याचा दावा केला आहे. मात्र अशा सरावाच्या आड रशिया युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. २४ तासांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, रशिया येत्या काही दिवसात कधीही युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असे बजावले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info