लंडन – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रातील प्रगती आणि त्याचा वाढता वापर यामुळे ब्रिटनमधील तब्बल ९० लाख नागरिकांच्या नोकर्या जाण्याचा धोका आहे, असा इशारा सरकारी अहवालात देण्यात आला आहे. ब्रिटनच्या ‘डिपार्टमेंट फॉर वर्क अॅण्ड पेन्शन्स’ने यासंदर्भात अहवाल तयार केला असून उत्पादन, सहाय्यक सेवा व रिटेल या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसेल, असे बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या आंतरराष्ट्रीय गटाने, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘रोबोटिक्स’मुळे मानवी समाजाला येत्या चार वर्षात तब्बल साडेसात कोटी नोकर्या गमवाव्या लागतील, अशी भीती व्यक्त केली होती.
‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये होणार्या प्रगतीमुळे ‘ऑटोमोशन’ तंत्राचा वापर वाढणार असून ‘रोबोट्स’चा खर्च मनुष्यबळापेक्षा कमी असेल. त्यामुळे सध्या माणसांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक संधींसाठी ‘रोबोट्स’चा वापर होऊ शकतो, असे ब्रिटीश सरकारच्या अहवालात बजावण्यात आले आहे. एकट्या ब्रिटनमध्ये पुढील दशकभरात मनुष्यबळाचा वापर असणारी ८८ लाखांहून अधिक पदे व संधी नाहीशा झालेल्या असतील, अशी चिंतादेखील अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी नाहीशा होण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटनने त्यासाठी उपाययोजना हाती घेतल्याची माहिती रोजगारमंत्री आलोक शर्मा यांनी दिली. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘ऑटोमेशन’चा वापर फारसा होणार नाही, अशा नोकर्या वाढविण्यावर सध्या भर देण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कंपन्या उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वाढता वापर करीत असल्या तरी नवी कौशल्ये असणार्या मनुष्यबळासाठीही वाढत्या संधी उपलब्ध होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
प्रत्येक औद्योगिक क्रांतीतून अर्थव्यवस्थेने गमावलेल्या नोकर्यांपेक्षा निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी जास्त आहेत, अशी ग्वाही देऊन रोजगारमंत्री शर्मा यांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’बाबतची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सध्या कार्यरत मनुष्यबळाला नव्या तंत्रज्ञानाशी निगडीत कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगार टिकविण्यासाठी गुंतवणूक करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘रोबोटिक्स’चा वापर प्रचंड वेगाने वाढत असून औद्योगिकदृष्ट्या प्रगत मानण्यात येणार्या युरोपिय देशांसह अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या‘फ्युचर ऑफ जॉब्स २०१८’ या अहवालात, २०२२ सालापर्यंत सरासरी ४२ टक्के नोकर्या रोबो व ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’वर आधारित तंत्रज्ञानावर सोपविण्यात आलेल्या असतील असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
याच अहवालात, सध्या उपलब्ध असणार्या कायमस्वरुपी नोकर्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपातीचा इशारा देऊन त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसेल, असे बजावण्यात आले होते. विख्यात उद्योजक ‘एलॉन मस्क’ यांनी जगभरात कार्यरत असलेल्या मनुष्यबळापैकी १५ टक्के रोजगार अतिप्रगत रोबोट हिरावून घेतील, असे बजावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |