ट्रम्प यांच्या कुटुंबियांवरील जैविक हल्ल्यावर अमेरिकन माध्यमांचे मौन – ट्रम्प यांचा मुलगा ‘एरिक ट्रम्प’यांची टीका

ट्रम्प यांच्या कुटुंबियांवरील जैविक हल्ल्यावर अमेरिकन माध्यमांचे मौन – ट्रम्प यांचा मुलगा ‘एरिक ट्रम्प’यांची टीका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांच्या घरी ‘व्हाईट पावडर’चे लिफाफे आले असल्याचा दावा ट्रम्प यांचा मुलगा ‘एरिक ट्रम्प’ यांनी केला. अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘एरिक ट्रम्प’ यांनी हा दावा केला आहे. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून ‘वॅनेसा ट्रम्प’ यांना ‘व्हाईट पावडर’द्वारे झालेल्या जैविक हल्ल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागल्याचे वृत्त समोर आले होते.

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ‘एरिक ट्रम्प’ यांनी या घटनेची दखल न घेणार्‍या अमेरिकी माध्यमांवर टीकास्त्र सोडले. ‘मला तसेच आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या घरी व्हाईट पावडर भरलेले लिफाफे पाठविण्यात आले आहेत. मात्र याची कुणीही दखल घेऊन त्याचा निषेध नोंदविलेला नाही’, अशी तक्रार ‘एरिक ट्रम्प’ यांनी या मुलाखतीत केली.

‘अमेरिकन माध्यमे ट्रम्प यांच्या प्रशासनाबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करीत असतात. ट्रम्प प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयांकडे दुर्लक्ष केले जाते आणि ट्रम्प यांच्या कुटुंबियांविरोधात वैयक्तिक पातळीवर आरोप केले जातात’, अशी खंत एरिक ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमे अतिशय दुटप्पीपणे वागत असून सातत्याने ट्रम्प कुटुंबियांवर हल्ले करण्यात येत असल्याचे एरिक ट्रम्प यांनी सांगितले. एरिक ट्रम्प यांनी आपल्या मुलाखतीत ‘व्हाईट पावडर’बाबत केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ट्रम्प कुटुंबियांमधील इतर सदस्यांकडेही ‘व्हाईट पावडर’चे लिफाफे पाठविले गेले होते, ही बाब पहिल्यांदाच समोर येत आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांची सून ‘वॅनेसा ट्रम्प’ यांना पाठविलेल्या ‘व्हाईट पावडर’ची घटना समोर आली होती. न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मुलगा ‘डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर’ यांच्या घरी एक लिफाफा पाठविण्यात आला होता. वॅनेसा ट्रम्प यांनी हा लिफाफा उघडल्यानंतर त्यांना भोवळ आली होती. यानंतर, वॅनेसा यांना ‘विएल कॉर्नेल मेडिकल सेंटर’ या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लिफाफ्यातील पावडर तपासासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने ताब्यात घेतली होती. ही पावडर म्हणजे ‘कॉर्न स्टार्च’ असल्याचे तपासातून समोर आले होते. त्यानंतर मार्च महिन्यात मॅसेच्युसेट्समधील ‘डॅनिअल फ्रिजिलो’ या 24 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. या तरुणाने इतर काही जणांना अशाच प्रकारे व्हाईट पावडर पाठविल्याचेही समोर आले होते.

अमेरिकेतील माध्यमांनी ‘डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर’च्या घरात पाठविण्यात आलेली पावडर हा जैविक हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘एरिक ट्रम्प’ यांनी मुलाखतीदरम्यान दिलेली ही माहिती लक्ष वेधून घेणारी ठरते. त्याचवेळी राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबावर होणार्‍या हल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची एरिक ट्रम्प यांनी केलेली तक्रार अमेरिकन माध्यमसृष्टीच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info