नवी दिल्ली – ‘चीन आपल्या संरक्षणदलांसाठी प्रचंड प्रमाणात खर्च करीत आहे. तसेच संरक्षणदलांच्या आधुनिकीकरण करून त्यांच्या कमांडस्ची फेररचनाही करीत आहे. गेल्या दहा वर्षात चीनच्या नौदलात सुमारे ८० युद्धनौकांचा समावेश झाला आहे. गेल्या दोनशे वर्षात कुठल्याही देशाच्या नौदलाचे सामर्थ्य इतक्या झपाट्याने वाढलेले नाही’, असे सांगून भारताचे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लान्बा यांनी चीनच्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘रायसेना डायलॉग’मध्ये नौदलप्रमुख बोलत होते.
‘रायसेना डायलॉग’मध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानच्या नौदलाचे प्रमुख अधिकारी सहभागी झाली असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे वाढते सामर्थ्य आणि अरेरावी यावर सदर परिषदेत गंभीर चर्चा झाली. यावेळी बोलताना भारताच्या नौदलप्रमुख अॅडमिरल लान्बा यांनी चीनच्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव करून देणारे दाखले दिले. त्याचवेळी हिंदी महासागर क्षेत्रात चाचेगिरीविरोधी कारवाईच्या निमित्ताने २००८ सालापासून चिनी नौदलाच्या सुमारे सहा ते आठ युद्धनौका कुठल्याही क्षणी तैनात असतात, याकडे नौदलप्रमुखांनी लक्ष वेधले.
दोन वर्षांपूर्वी हिंदी महासागर क्षेत्रातील ‘जिबौती’ या देशात चीनने आपला कायमस्वरुपी तळ उभा केला आहे, याचीही आठवण नौदलप्रमुख लान्बा यांनी करून दिली. सदर परिषदेत सहभागी झालेले अमेरिकन नौदलाच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’चे प्रमुख अॅडमिरल फिलिफ एस. डेव्हिडस्न यांनीही चीनच्या या सागरी क्षेत्रातील हालचाली चिंताजनक असल्याचे परखड मत मांडले. चीनच्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे अमेरिकेलाही या सागरी क्षेत्राबाबतची आपली भूमिका बदलावी लागली. अमेरिकेने आपल्या पॅसिफिक कमांडचे नाव बदलून ‘इंडो-पॅसिफिक’ असे केले. हा बदल अमेरिकेच्या बदललेल्या राजकीय व सामरिक धोरणांचे संकेत देत आहे, अशी सुस्पष्ट कबुलीच यावेळी अॅडमिरल डेव्हिडस्न यांनी दिली.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात, अमेरिका, भारत व जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे सहकार्य चीनला रोखण्यासाठीच आहे का, असा प्रश्न या परिषदेत अॅडमिरल डेव्हिडस्न यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अमेरिकेने या क्षेत्रातील देशांसमोर ‘अमेरिका किंवा चीन’ यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय ठेवलेला नाही, असा खुलासा केला. वेगळ्या शब्दात चीनच या क्षेत्रातील देशांसमोर अशा स्वरुपाचे निर्णायक पर्याय ठेवत असल्याचे अमेरिकन नौदलाच्या कमांडप्रमुखांनी सुचविले आहे.
दरम्यान, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या सामर्थ्यामुळे निर्माण झालेला असमतोल दूर करणे अनिवार्य बनल्याचे संकेत जपान व ऑस्ट्रेलियाच्या नौदल अधिकार्यांनी दिले आहेत. त्याचवेळी भारत या क्षेत्रात अमेरिका तसेच इतर देशांबरोबर सहकार्य वाढवित आहे, त्यामागे इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा व स्थैर्य तसेच आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या नियमांचे पालन या गोष्टी असल्याचे भारताच्या नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले. सध्या या सार्या गोष्टींना चीनकडून आव्हान मिळत आहे, याचा थेट उल्लेख न करता अॅडमिरल लान्बा यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट केल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |