इराणपेक्षाही तुर्कीकडून आखाती देशांना सर्वाधिक धोका – गुप्तचरप्रमुखांच्या गोपनीय बैठकीतील निष्कर्ष

इराणपेक्षाही तुर्कीकडून आखाती देशांना सर्वाधिक धोका – गुप्तचरप्रमुखांच्या गोपनीय बैठकीतील निष्कर्ष

लंडन – अमेरिकेच्या सिरियातील माघारीच्या घोषणेमुळे आखातातील घडामोडींनी वेग घेतला आहे. इस्रायल आणि अरब देशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांमध्ये गेल्या महिन्यात गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत, इराणपेक्षा तुर्कीचा आखातातील वाढता प्रभाव धोकादायक ठरत असल्याच्या मुद्यावर इस्रायल व अरब मित्रदेशांमध्ये एकमत झाले आहे. ब्रिटनस्थित आखाती वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली.

गेल्या महिन्यात आखातात या क्षेत्रातील इस्रायल तसेच सौदी अरेबिया, ‘संयुक्त अरब अमिरात’ (युएई) आणि इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची गोपनीय बैठक पार पडली. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख ‘योसी कोहेन’ या बैठकीत सहभागी झाले होते, असा दावा आखाती वृत्तसंस्थेने केला. यावेळी इराण व तुर्की यांचा आखातातील वाढत्या प्रभावावर चर्चा पार पडल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

यावेळी इराण आणि तुर्कीपासून असलेल्या धोक्यावर इस्रायल व इतर आखाती देशांमध्ये चर्चा झाली. इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र धोक्याचा मुकाबला करण्यासाठी लष्करी कारवाईचा वापर केला जाऊ शकतो, असे ‘मोसाद’चे प्रमुख कोहेन यांनी या बैठकीत सांगितले. पण इराणपेक्षाही तुर्कीपासून आखाती देशांच्या सुरक्षेला सर्वाधिक धोका असल्याचे कोहेन यांनी लक्षात आणून दिल्याचे या आखाती वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

‘इराणची राजवट सहजपणे उलथविता येईल. आखातातील इराणचा वाढता धोका लष्करी कारवाईने दूर करता येऊ शकतो. पण तुर्की हा इराणपेक्षाही अधिक धोकादायक असून तुर्कीला रोखणे सर्वात कठीण ठरेल’, असा इशारा कोहेन यांनी या बैठकीत दिला. कोहेन यांनी तुर्कीबाबत अशी भूमिका का मांडली, याबाबतचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांच्या या मताशी सौदी, युएई आणि इजिप्तही सहमत आहेत.

तुर्कीचा हा वाढत असलेला धोका टाळण्यासाठी किंवा तुर्कीला प्रत्युत्तर देण्यासाठी अरब देशांनी इराक, सिरिया आणि तुर्कीतील कुर्द गटांच्या पाठिशी आपले समर्थन उभे करावे, यावर या बैठकीत चर्चा झाली, असे आखाती वृत्तसंस्थेने सांगितले. तुर्कीने आपल्या देशातील कुर्दांची ‘कुर्दिस्तान वर्कस पार्टी’ (पीकेके) ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर ‘पीकेके’शी संलग्न असलेल्या सिरिया आणि इराकमधील संघटनाही दहशतवादी ठरवून तुर्कीने त्यांच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे. त्यामुळे या कुर्द संघटनांना मजबूत केले तर तुर्कीचा प्रभाव रोखता येईल. यासाठी अरब देशांना इस्रायलकडून पाठिंबा मिळेल, असे विश्‍लेषण आखाती वृत्तसंस्थेने केले आहे.

या व्यतिरिक्त सिरियातील अस्साद यांची राजवट उधळण्याच्या योजनेतून अरब देशांनी माघार घेतल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीला इस्रायली किंवा अरब देशांनी दुजोरा दिलेला नाही. पण इजिप्तमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अरब लीगच्या बैठकीतही संयुक्त अरब अमिरात आणि सुदान या देशांनी अस्साद यांच्यावरील निर्बंध मागे घेऊन सिरियाला पुन्हा अरब लीगमध्ये स्थान देण्याचे संकेत दिले होते. यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्नही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या ऐतिहासिक ओमान दौर्‍याच्या तयारीमागे ‘मोस्साद’चे प्रमुख कोहेन असल्याचेही बोलले जाते. नेत्यान्याहू यांच्या भेटीआधी कोहेन यांनी अरब देशांचा दौरा करून या भेटीसाठी सकारात्मक वातावरण तयार केले होते, असा दावा केला जातो. तर याआधीही आखाती तसेच ब्रिटनमधील माध्यमांनी इस्रायल व अरब देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये गोपनीय भेटीगाठी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info