रशिया व्हेनेझुएलात अतिरिक्त लष्कर तैनात करील – व्हेनेझुएलाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

रशिया व्हेनेझुएलात अतिरिक्त लष्कर तैनात करील – व्हेनेझुएलाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

मॉस्को/कॅराकस – व्हेनेझुएलाचे सरकार कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास तयार असून आवश्यकता भासल्यास रशिया देशात अतिरिक्त लष्कर पाठविण्याच्या तयारीत आहे, असा दावा व्हेनेझुएलाचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज अरेझा यांनी केला. अमेरिका व्हेनेझुएलावर आक्रमणाच्या तयारीत असून हाती असलेल्या शस्त्रांसह मातृभूमीवरील आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज रहा, असे आदेश व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांनी नुकतेच दिले होते. या पार्श्‍वभूमीवर अरेझा यांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

गेल्या काही दिवसात अमेरिकेकडून सातत्याने व्हेनेझुएलात लष्करी हस्तक्षेप करण्याची धमकी देत आहे. अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या जुआन गैदो यांनी व्हेनेझुएलाच्या लष्कराने मदुरो यांची साथ सोडावी, असे आवाहन केले होते. पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मदुरो यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अमेरिकेसमोर लष्करी कारवाईचाच पर्याय असल्याचे समोर येत आहे. त्यासाठीही अमेरिका तयार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेच्या या कारवाईला तोंड देण्यासाठी रशिया, चीन, क्युबा या देशांनीही तयारी केली असून व्हेनेझुएलातील लष्करी कारवाई अमेरिकेला महागात पडेल, असे या देशांनी बजावले आहे. या पार्श्‍वभूमीवर व्हेनेझुएलाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाला भेट देऊन अतिरिक्त सहाय्याची मागणी समोर ठेवल्याचे दिसते.

परराष्ट्रमंत्री अरेझा यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव यांची मॉस्कोत भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी रशिया-व्हेनेझुएला लष्करी सहकार्य वाढविण्यावर एकमत झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी रशियाने व्हेनेझुएलाच्या सुरक्षेसाठी लष्करी अधिकार्‍यांची तुकडी तैनात केली असून आवश्यकता पडल्यास त्यात वाढ केली जाईल, असे अरेझा म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी रशियाच्या प्रगत ‘बॉम्बर’ विमानाने व्हेनेझुएलाला भेट दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर व्हेनेझुएलाने आपले एक बेट रशियाला लष्करी तळ उभारण्यासाठी दिल्याची माहितीही समोर आली होती. तर अमेरिकेच्या एका वरिष्ठ संसद सदस्याने तर रशियाने व्हेनेझुएलात अण्वस्त्रे तैनात केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अमेरिका व रशियातील संघर्षाची नवी रणभूमी म्हणून व्हेनेझुएलाचा वापर होईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info