आखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन

आखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन

मियामी – अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराण तसेच हिजबुल्लाहच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पण ही कोंडी फोडण्यासाठी हिजबुल्लाह लॅटिन अमेरिकेच्या व्हेनेझुएलामधील सोन्याच्या खाणींचे उत्खनन करीत आहे. इथल्या काही सोन्याच्या खाणींवर हिजबुल्लाहचे वर्चस्व असून या दहशतवादी संघटनेकडून या खाणींमधून बेकायदेशीररित्या सोन्याचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप व्हेनेझुएलातील एका बड्या नेत्याने केला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदूरो यांचेही हिजबुल्लाहच्या या तस्करीला समर्थन असल्याचा ठपका ठेवून या नेत्याने करून खळबळ उडवून दिली.

हिजबुल्लाह, सोन्याचे उत्खनन, निकोलस मदूरो, दहशतवादी संघटना, आरोप, ww3, व्हेनेझुएला, बोलिव्हर

व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेते ‘अमरिको दी ग्राझिया’ यांनी एका दैनिकाशी बोलताना मदूरो सरकारवर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष मदूरो यांची मालकी असलेल्या ‘ओरीनोको मायनिंग आर्क’ या कंपनीने ‘बोलिव्हर’ राज्यात खनिजांच्या उत्खननासंबंधीचे मोठे प्रोजेक्ट सुरू केले. व्हेनेझुएलातील तब्बल १२ टक्के खनिजांच्या उत्खननाचे कंत्राट मदूरो यांच्या कंपनीला मिळाले आहेत. मदूरो यांच्या या कंत्राटावर प्रश्‍न उपस्थित केले जात असतानाच विरोधी नेते ग्राझिया यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्यवहारांवरही बोट ठेवले.

इराणचे समर्थन असलेली ‘हिजबुल्लाह’ ही संघटना तसेच ‘नॅशनल लिबरेशन आर्मी’ या कोलंबियातील दहशतवादी संघटनांनाही मदूरो सरकारने येथील खाणउत्खननाचे हक्क दिल्याचा आरोप ग्राझिया यांनी केला. येथील दोन सोन्याच्या खाणींची मालकी हिजबुल्लाहकडे असल्याचा दावा ग्राझिया यांनी केला. हिजबुल्लाहबरोबरच्या या सहकार्यामुळे व्हेनेझुएलाच्या सरकारला मोठा आर्थिक लाभ होईल, असा दावा मदूरो सरकार करीत आहे. पण बोलिव्हर राज्यातील खनिजसंपन्न खाणींची मालकी हिजबुल्लाहला देऊन मदूरो सरकारने या दहशतवादी संघटनेला सहाय्य पुरविल्याचा आरोप ग्राझिया यांनी केला.

जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये व्हेनेझुएलाचा समावेश केला जातो. सोन्याबरोबरच डायमंड्स, कोल्टन, बॉक्साईड आणि अशा दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. एकट्या बोलिव्हर राज्यात सात हजार टन इतका खनिजसंपत्तीचा साठा असल्याचा दावा केला जातो.

मात्र राष्ट्राध्यक्ष मदूरो आपल्या कंपनीच्या आड परदेशी कंपन्यांबरोबर करार करून या खनिजांची लूट करीत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी मदूरो आपली तिजोरी भरण्यासाठी परदेशी कंपन्यांना खनिजांच्या उत्खननाचे कंत्राट देत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अशाच एका कंत्राटासाठी व्हेनेझुएलाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी तुर्कीचा दौरा करून सोन्याच्या खाणींचे उत्खननासंबंधी करार केला आहे.

दरम्यान, अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना घोषित करून याआधीच आर्थिक निर्बंध लादले आहेत. तर अमेरिकेने देखील इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादून हिजबुल्लाहला मिळणार्‍या अर्थसहाय्याच्या नाड्याही आवळल्या होत्या. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढल्यानंतर हिजबुल्लाहला मिळणार्‍या आर्थिक सहाय्यात कपात होईल, असे बोलले जात होते. पण इराणचा सहकारी देश असलेल्या व्हेनेझुएलाने हिजबुल्लाहला सोन्याच्या खाणींचे मालकी हक्क देऊन इराणची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मदूरो यांच्या विरोधकांकडून सुरू झाला आहे.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info