सौदी अरेबिया गुप्तपणेे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे विकसित करीत आहे – अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राचा दावा

सौदी अरेबिया गुप्तपणेे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे विकसित करीत आहे – अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन/दुबई – इराणच्या अणुकार्यक्रमाला प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी अरेबियानेही छुप्यारितीने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू केल्याचा दावा ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिकेचे समर्थन मिळाले नाही, तर इराणला उत्तर देण्यासाठी सौदीने क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरू केल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. इराण अण्वस्त्रसज्ज बनला तर सौदी अरेबियाही अण्वस्त्रसज्ज होईल, असा इशारा सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी दिला होता, याची आठवणही या वर्तमानपत्राने करून दिली.

सौदीची राजधानी रियाधपासून २३० किलोमीटर अंतरावर असणार्या ‘अल-दवादमी’ या लष्करी तळावर सौदीकडून गोपनीयरित्या क्षेपणास्त्रनिर्मिती सुरू असल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे. या लष्करी तळावर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या निर्मिती व चाचणीसाठी आवश्यक ते बांधकाम सौदीने पूर्ण केल्याचा दावाही अमेरिकी वर्तमानपत्राने केला. तसेच सौदीतील लष्करी तळाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही सदर वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले.

नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या फोटोग्राफ्समध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती, चाचणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचे या फोटोग्राफ्समध्ये दाखविण्यात आले?आहे. एखाद्या देशाने क्षेपणास्त्राच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे म्हणजे त्या देशांला अण्वस्त्रांच्या निर्मितीमध्ये स्वारस्य असल्याचे सूचित करणारे असल्याचा दावा ‘जेफ्री लुईस’ या अमेरिकी विश्लेषकाने सदर वर्तमानपत्रात केला. हा दाखला देऊन सौदी अरेबिया

अण्वस्त्रनिर्मितीसाठी पावले टाकीत असल्याचा संशय विश्लेषक लुईस यांनी व्यक्त केला. तसेच लुईस यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी सौदीला अण्वस्त्रसज्ज करण्याबाबत केलेल्या घोषणेचा संदर्भ लुईस यांनी दिला. पाश्चिमात्य देशांबरोबर केलेल्या अणुकरारानंतरही इराण अण्वस्त्रसज्ज होणार असेल, तर सौदी अरेबियाही अण्वस्त्रे मिळविल्यावाचून राहणार नाही, असे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी बजावले होते. सौदीचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री ‘अदेल अल-जुबैर’ यांनीही सौदी अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो, असा इशारा दिला होता. तसेच सौदी पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची खरेदी करू शकतो, असा दावाही विश्लेषकांनी केला होता. दरम्यान, अमेरिकी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आणि त्यावर अमेरिकी विश्लेषकाने दिलेल्या माहितीबाबत सौदी अरेबियाची राजवट तसेच अमेरिकेतील सौदीकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण ही बातमी सौदी अरेबिया व इराणमधील सत्तासंघर्ष आण्विक पातळीपर्यंत पोहोचल्याचे दाखवून देत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info