आधुनिक काळातील रशियाविरोधातील युद्ध पूर्णपणे वेगळे असेल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची अमेरिकेला धमकी

आधुनिक काळातील रशियाविरोधातील युद्ध पूर्णपणे वेगळे असेल

मॉस्को /वॉशिंग्टन, दि. ३ (वृत्तसंस्था) – ‘रशियाने पाश्चिमात्य देशांविरोधात संघर्ष करण्यासाठी त्यांच्या सीमेवर रणगाडे पाठविलेले नाहीत. पण रशियाकडे प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही फक्त सशस्त्र वाहनांचा वापर करून थांबणार नाही आणि याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. आधुनिक काळात रशियाविरोधातील युद्ध हे पूर्णपणे वेगळे असेल’, अशा आक्रमक शब्दात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना धमकावले आहे. दुसऱ्या महायुद्धात गाजलेल्या ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’ला ८० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुढील काळात रशिया-युक्रेन संघर्ष अधिक प्रखर होणार असल्याची जाणीव करून दिली.
नव्या वर्षात रशिया युक्रेनविरोधातील मोहिमेची धार अधिक वाढवित असतानाच पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रसहाय्य जाहीर करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. गेल्याच महिन्यात अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रांची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला नव्या संरक्षणयंत्रणा पुरविण्याचे संकेत दिले आहेत. यात ‘ग्राऊंड लॉन्च्ड् स्मॉल डायमीटर बॉम्ब’(जीएलएसडीबी) क्षेपणास्त्रांसह सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसामुग्रीचा समावेश असेल, असे अमेरिकी सूत्रांनी सांगितले. सदर क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याला मान्यता देऊन अमेरिकेने युक्रेनच्या रशियातील हल्ल्यांना एक प्रकारे मंजुरीच दिली असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.
दुसऱ्या बाजूला जर्मनीसह युरोपातील अनेक देशांनी युक्रेनला विविध प्रकारचे रणगाडे तसेच तोफा पाठविण्याचे जाहीर केले आहे. जर्मनी ‘लिओपार्ड १’ व ‘लिओपार्ड २’ असे दोन्ही रणगाडे युक्रेनला धाडणार आहे. फ्रान्स, पोलंड, ब्रिटन या देशांनीही आपल्याकडील रणगाडे युक्रेनला देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनने रणगाड्यांबरोबरच लढाऊ विमाने धाडण्याचेही संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून युक्रेनला प्रगत ‘एमक्यू ९ रिपर ड्रोन्स’ देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
पाश्चिमात्यांकडून देण्यात येणारे हे शस्त्रसहाय्य म्हणजे नाटोने रशियाविरोधात युद्धात उतरल्याची घोषणा असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे नाटोविरोधातील या संघर्षासाठी रशिया अधिक आक्रमकपणे उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रशियन लष्कराची जमवाजमव व इतर योजनांबद्दल विविध दावे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या इशाऱ्यामुळे त्याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.
पुतिन यांनी सध्या युक्र्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची तुलना दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीविरोधात केलेल्या संघर्षाशी केली. युक्रेनमधील युद्ध हे दुसऱ्या महायुद्धातील ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’प्रमाणेच असल्याकडेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’मध्ये सुरुवातीला रशियन लष्कराला जबर हानी सहन करून माघार घेणे भाग पडले होते. मात्र त्यानंतर रशियाने नाझी सेनेला जबर प्रत्युत्तर देऊन पराभूत केले होते. पुतिन यांनी याचा उल्लेख करणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनमधील संघर्षात ‘मार्कर’ हे रोबोटिक रणगाडे तैनात करण्याचे संकेत दिले आहेत. जर्मनी व अमेरिकेच्या रणगाड्यांना रशिया रोबोटिक रणगाड्यांनी प्रत्युत्तर देईल, असा दावा रशियन लष्करी सूत्रांनी केला.

English        हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info