इटलीचे उपपंतप्रधान ‘डि मेओ’ फ्रान्समधील ‘यलो वेस्ट’ आंदोलकांना भेटले – भेटीमुळे इटली व फ्रान्समधील तणाव वाढला

पॅरिस/रोम – इटलीचे उपपंतप्रधान व ‘फाईव्ह स्टार मुव्हमेंट’चे प्रमुख ‘लुईगी डि मेओ’ यांनी मंगळवारी फ्रान्समध्ये ‘यलो वेस्ट’ आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. इटलीत निर्वासितांविरोधात भूमिका घेणारे उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर असून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे या सरकारशी वारंवार खटके उडाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इटलीच्या सत्ताधारी नेत्याने मॅक्रॉनविरोधी निदर्शकांची भेट घेणे लक्ष वेधून घेणारे ठरते. या भेटीमुळे फ्रान्स व इटलीत निर्माण झालेला तणाव अधिकच चिघळेल, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याविरोधात सुरू झालेली ‘यलो वेस्ट’ निदर्शने सलग तीन महिने सुरू असून इतर युरोपिय देशांमध्येही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. युरोपिय देशांमधील सत्ताधारी राजवटींसह आघाडीच्या राजकीय गटांनीही त्याला पाठिंबा जाहीर केला असून इटली त्यातील प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. इटली सरकारमधील अंतर्गत सुरक्षा मंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी व उपपंतप्रधान ‘लुईगी डि मेओ’ यांनी ‘यलो वेस्ट’ आंदोलनाला सुरुवातीपासूनच समर्थन दिले होते. मात्र थेट फ्रान्समध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेणे खळबळ उडविणारे ठरले आहे.

मे महिन्यात युरोपियन संसदेची निवडणूक असून ‘५ स्टार मुव्हमेंट’चे डि मेओ डाव्या विचारसरणीच्या गटांची आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी डि मेओ यांचा युरोप दौरा सुरू असून त्याअंतर्गत त्यांनी मंगळवारी फ्रान्सला भेट दिली. राजधानी पॅरिसनजिक त्यांनी ‘यलो वेस्ट’ आंदोलनातील एक नेते ‘क्रिस्तोफ शॅलेन्कॉन’ व त्यांच्या सहकार्‍यांची भेट घेतली. यावेळी इटलीतील ‘५ स्टार मुव्हमेंट’चे प्रमुख नेते ‘अलेसांड्रो दि बाटिस्टा’देखील उपस्थित होते.

‘युरोपमधील बदलांचे वारे आल्प्सच्या पर्वतरांगा ओलांडून पुढे गेले आहेत. मी याची पुनरावृत्ती करतो. बदलांचे वारे आल्प्सच्या पर्वतरांगा ओलांडून पुढे गेले आहेत’, अशा शब्दात इटलीचे उपपंतप्रधान डि मेओ यांनी ‘यलो वेस्ट’ आंदोलनकर्त्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी आमच्यात अनेक मुद्दे व मूल्यांबाबत समान भूमिका असल्याचा दावाही इटलीच्या उपपंतप्रधानांनी केला. त्यात सामान्य नागरिकांची सुरक्षा, सामाजिक हक्क, थेट लोकशाही व पर्यावरणासारख्या मुद्यांचा समावेश असल्याचेही डि मेओ म्हणाले.

युरोपातील निर्वासितांबाबतची भूमिका, अर्थव्यवस्थेची हाताळणी व नियम, रशियाबाबतचे धोरण यासारख्या अनेक मुद्यांवरून इटली सरकार व फ्रान्सच्या मॅक्रॉन राजवटीत खटके उडाले आहेत. काही आठवड्यांपूर्वी इटलीच्या नेत्यांनी फ्रान्सला आफ्रिकेतील दारिद्य्रासाठी जबाबदार धरले होते. त्याचवेळी लिबियातील समस्येबाबत फ्रान्सची धोरणे चुकीची असल्याचा आरोपही इटलीच्या नेतृत्त्वाने केला होता. अंतर्गत सुरक्षा मंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे युरोपात निर्वासितांचे स्वागत करणार्‍या प्रस्थापित गटाचे नेते असल्याचाही दावा केला होता.

मॅक्रॉन यांनीही इटलीतील सॅल्व्हिनी व डि मेओ हे नेते आपले शत्रू असल्याचे सांगून आपण संघर्षासाठी तयार असल्याची ग्वाही दिली होती. मॅक्रॉन यांच्या या भूमिकेला इटलीचे उपपंतप्रधान डि मेओ यांनी त्यांच्याच देशात जाऊन विरोधकांशी हातमिळवणी करून खणखणीत प्रत्युत्तर दिल्याचे ‘यलो वेस्ट’च्या भेटीवरून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी प्रमुखांनी, फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांना विरोध करणारे ‘यलो वेस्ट’ इटलीत सत्तेवर आहेत, असे वक्तव्य करून खळबळ उडवली होती.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info