शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेतला जाईल – भारताच्या नेत्यांचा इशारा

शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेतला जाईल – भारताच्या नेत्यांचा इशारा

नवी दिल्ली – पुलवामामधील हल्ल्याची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कठोर शब्दात निर्भत्सना केली. या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबासोबत सारा देश उभा असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदविला. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, असे सूचक उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हा हल्ला अस्वस्थ करणारा असल्याचे म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री अरुण जेटली या भ्याड हल्ल्यानंतर दहशतवादी कधीही विसरणा नाहीत, असा धडा शिकविला जाईल, असे म्हटले आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याबरोबच माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी या हल्ल्यामुळे आपले रक्त खवळल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेतला जाईल, असे जनरल व्ही. के. सिंग म्हणाले. माजी लष्करी अधिकार्‍यांनी तसेच लष्करी विश्‍लेषक व मुत्सद्दी देखील या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया देत असून आता पाकिस्तानशी चर्चा व वाटाघाटींचा मार्ग बंद झाल्याचे बजावत आहेत.

पुढच्या काळात पाकिस्तानला कायमची अद्दल घडविल्याखेरीज असे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत, असे या माजी लष्करी अधिकार्‍यांचे तसेच विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करून किंवा युद्ध पुकारण्यासारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे आहेच. पाकिस्तानला जेरीस आणण्याचे इतर पर्यायही समोर असल्याची माहिती माजी लष्करी अधिकारी देत आहेत. पाकिस्तानबरोबरील व्यापार भारताने पूर्णपणे बंद करावा व भारतातून पाकिस्तानात वाहणार्‍या नद्यांचे पाणी रोखावे, असा सल्ला माजी लष्करी अधिकारी सरकारला देत आहेत.

जो देश आमच्या विरोधात अघोषित युद्ध पुकारत आहे, अशा देशाला आमच्याकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळणार नाही, हे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठणकावून सांगावे, अशी मागणीही या निमित्ताने केली जात आहे. दरम्यान, भारतातील अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी केन जस्टर यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादविरोधी युद्धात अमेरिका भारताच्या सोबत असल्याचे जस्टर यांनी म्हटले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info