भारतीय सैनिकांवरील हल्ल्याची आग रावळपिंडीपर्यंत पोहोचेल – पश्तून नेत्याचा पाकिस्तान सरकारला इशारा

‘पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेला हल्ला हा आमच्यावरील हल्ला आहे. पश्तून, सिंधी आणि बलूच नागरिक पाकिस्तान सरकार व लष्कर खेळत असलेले डाव ओळखून आहेत. भारतीय सैनिकांवरील हल्ल्याने भडकलेली आग आता रावळपिंडीपर्यंत पोहोचेल. पुलवामा हल्ल्याचा आम्ही सूड घेऊ. पश्तूनिस्तान, बलुचिस्तान आणि सिंधूदेश स्वतंत्र होईपर्यंत आमचा हा संघर्ष सुरू राहिल. प्रत्येक भारतीय सैनिकाच्या रक्ताच्या थेंबाची किंमत पाकिस्तान सरकारला मोजावी लागेल. आम्ही लवकरच पाकिस्तानच्या अंताचे कारण ठरू’, अशी जळजळीत धमकी पाकिस्तानातील पश्तून नेता ‘आझाद खान’ याने दिली.

पाकिस्तानातील ‘पश्तून लिबरेशन फ्रंट’ या संघटनेचा नेता ‘आझाद खान’ याने पाकिस्तानातील इम्रान खान सरकारला इशारा देणारी ऑडिओ रविवारी प्रसिद्ध केली. या ऑडिओमध्ये आझाद खान याने पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. भारतीय सैनिक बांधवांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचे सांगून याची सुरुवात पाकिस्तानी लष्कराच्या कॅम्पपासून होईल, असे खान याने म्हटले आहे.

भारतात दहशतवादी हल्ले घडविणारे पाकिस्तानी लष्कर येथे पाकिस्तानात पश्तून, बलूच आणि सिंधी नागरिकांवर अत्याचार करीत असल्याचा घणाघाती आरोप खान याने यावेळी केला. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनवाला आणि बलुचिस्तान प्रांतात पश्तून व बलूच नागरिकांनी सरकारविरोधात मोठी निदर्शने सुरू केली आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info