‘पुलवामा’चे परिणाम दिसू लागले – पाकिस्तानचे पाणी तोडण्याचा भारताचा कठोर निर्णय

‘पुलवामा’चे परिणाम दिसू लागले – पाकिस्तानचे पाणी तोडण्याचा भारताचा कठोर निर्णय

नवी दिल्ली – आधी झालेल्या युद्धाच्या काळातही घेतला नव्हता इतका कठोर निर्णय घेऊन भारताने आपल्या भूभागातून पाकिस्तानात वाहणार्‍या नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. या नद्यांचे पाणी यमुनेकडे वळविले जाईल, अशी घोषणा केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दोन्ही देशांमध्ये १९६० साली झालेला ‘सिंधू पाणीवाटप करार’ मोडीत काढून भारताने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडविण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे. भारताने हा निर्णय घेतलाच तर ती युद्धाची घोषणा मानली जाईल, अशी धमकी याआधी पाकिस्तानने दिली होती.

बागपत येथे एका सभेला संबोधित करताना केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे भारतातून पाकिस्तानात वाहणार्‍या तीन नद्यांचे पाणी अडवून ते यमुनेत सोडले जाईल, असे जाहीर केले. यामुळे यमुनेतील पाणी वाढेल, असे सांगून गडकरी यांनी पाकिस्तानची झोप उडविली आहे. तसेच रावी नदीवर ‘शाहपूर कंडी’ येथे धरणाचे कामही सुरू झाले आहे, असे सांगून गडकरी यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काम सुरू झाल्याचे स्पष्ट केले.

यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी यापुढे पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असे बजावले आहे. त्याचवेळी भारत आपल्या औदार्याचा भाग म्हणून पाकिस्तानला अतिरिक्त पाणी देत राहिला, याचीही आठवण जितेंद्र सिंग यांनी करून दिली.

रावी ही जम्मू-काश्मीर व पंजाबमधून पाकिस्तानात वाहणारी मोठी नदी असून या नदीचे पाणी आजवर पाकिस्तानला विनासायास मिळत होते. पण यापुढे तसे होऊ देणार नाही, असे सांगून जितेंद्र सिंग यांनी ‘पुलवामा’तील हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागेल, असे संकेत दिले.

पाकिस्तानबरोबर झालेल्या १९६५, १९७१ तसेच १९९९ सालच्या कारगिल युद्धानंतरही भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. युद्धाच्या काळातही भारताने ‘सिंधू पाणीवाटप करारा’चे पालन केले होते. मात्र दहशतवादी हल्ले चढवित राहून भारताशी अघोषित युद्ध खेळत राहणार्‍या पाकिस्तानला यापुढे आपल्या औदार्याला लाभ मिळू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

२०१६ साली उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदाच ‘सिंधू पाणीवाटप करारावर’ फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असे भारताच्या पंतप्रधानांनी उरी येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानला बजावले होते. मात्र भारताने पाकिस्तानचे पाणी तोडले तर ती आपल्या देशाच्या विरोधातील युद्धाची घोषणाच ठरेल, असा इशारा त्यावेळच्या पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताझ अझिज यांनी दिला होता. तसेच भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागेल, असेही अझिज त्यावेळी म्हणाले होते.

पाकिस्तानची सुमारे ९० टक्के इतकी शेती भारतातून पाकिस्तानात वाहणार्‍या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे पाणी रोखले तर पाकिस्तानचे रखरखीत वाळवंट बनल्याखेरीज राहणार नाही. यामुळे पाकिस्तानी जनतेवर उपासमारीची वेळ ओढावेल, असा इशारा पाकिस्तानी विश्‍लेषकांनी दिला होता. तसेच भारत कुठल्याही क्षणी हा निर्णय घेऊन पाकिस्तानवर आपला ‘वॉटर बॉम्ब’ टाकू शकतो याची जाणीवही विश्‍लेषकांनी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना करून दिली होती.

असे असूनही पाकिस्तानने भारताला गृहित धरण्याची चूक केली. म्हणूनच पाकिस्तानवर खर्‍या अर्थाने सत्ता असलेल्या लष्कराने दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू ठेवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे धोरण कायम ठेवले होते. याचे परिणाम चुकते करण्याची वेळ आली असून आधीच अर्थव्यवस्था रसातळाला गेलेल्या पाकिस्तानला यापुढे पाण्यासाठीही वणवण करावी लागणार आहे.

 

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info