व्हेनेझुएलाच्या मदुरो यांची अवस्था लिबियन हुकुमशहा गद्दाफी यांच्याप्रमाणे होईल – अमेरिकी सिनेटर मार्को रुबिओ यांचा ‘गूढ’ इशारा

व्हेनेझुएलाच्या मदुरो यांची अवस्था लिबियन हुकुमशहा गद्दाफी यांच्याप्रमाणे होईल – अमेरिकी सिनेटर मार्को रुबिओ यांचा ‘गूढ’ इशारा

वॉशिंग्टन/कॅराकस – व्हेनेझुएलातील हुकुमशहा निकोलस मदुरो यांची अवस्था लिबियाचे दिवंगत हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्याप्रमाणे होईल, असा इशारा अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबिओ यांनी दिला. सोशल मीडियावर केलेल्या एका ट्विटमध्ये रुबिओ यांनी गद्दाफी यांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून हा इशारा दिला. अमेरिकेचे प्रमुख नेते व्हेनेझुएलाविरोधात लष्करी कारवाईचे संकेत देत असतानाच रुबिओ यांनी गद्दाफी यांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केल्याने त्यातून वेगळेच संकेत जात असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांसह आंतरराष्ट्रीय समुदायात सुरू झाली आहे.

रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख सिनेटर मार्को रुबिओ यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर एक ट्विट टाकले. या ट्विटमध्ये त्यांनी लिबियाचे हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी यांची दोन फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. यातील एका फोटोग्राफमध्ये पांढरा कोट, हिरवा शर्ट व गॉगल घालून हातांवर हात ठेवलेले गद्दाफी दाखविण्यात आले आहेत.

तर दुसर्‍या छायाचित्रात, विरोधकांकडून होणार्‍या मारहाणीमुळे चेहर्‍यावर रक्ताचे डाग पडलेले गद्दाफी दाखविण्यात आले आहेत. रुबिओ यांनी या छायाचित्राबरोबर कोणतीही प्रतिक्रिया प्रसिद्ध केलेली नाही. त्यांच्या या ‘ट्विट’ला जवळपास ३२ हजार ‘लाईक्स’ मिळाले असून १८ हजार जणांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदविली आहे. रुबिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या या ‘ट्विट’वर प्रसारमाध्यमांसह आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

रुबिओ हे अमेरिकेच्या संसदेतील प्रभावशाली सिनेटर म्हणून ओळखण्यात येत असून ‘व्हेनेझुएला’बाबत ठरविण्यात येणार्‍या धोरणांशी निगडित समितीत त्यांचा सहभाग आहे. रविवारी ट्विट प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी व्हेनेझुएलातील वाढत्या हिंसाचाराच्या मुद्यावर आक्रमक वक्तव्य केले होते. या हिंसाचारामुळे व्हेनेझुएलात विविध प्रकारच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचा इशारा रुबिओ यांनी दिला होता. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेक देश अशा प्रकारच्या कारवाईसाठी तयार झाल्याचे संकेतही त्यांनी दिले.

रुबिओ यांच्या गूढ ‘ट्विट’ला अमेरिकेच्या इतर प्रमुख नेत्यांकडून व्हेनेझुएलाबाबत करण्यात येणार्‍या वक्तव्यांची पार्श्‍वभूमी आहे. रविवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिलेल्या मुलाखतीत व्हेनेझुएलाचे हुकुमशहा ‘निकोलस मदुरो’ यांचे दिवस भरत आल्याचा इशारा दिला होता. जोपर्यंत मदुरो यांना याची जाणीव होती नाही, तोपर्यंत अमेरिका मदुरो यांच्यावरील दडपण कायम ठेवेल, असेही पॉम्पिओ यांनी बजावले.

सोमवारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स कोलंबियाच्या राजधानीत दाखल होणार असून ते व्हेनेझुएलाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष ‘जुआन गैदो’ यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पेन्स यांच्याकडून व्हेनेझुएलाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

लिबियाचे हुकुमशहा म्हणून ओळखण्यात येणार्‍या मुअम्मर गद्दाफी यांनी १९६९ ते २०११ अशा चार दशकांहून अधिक काळ लिबियाची सत्ता राखली होती. मात्र २०११ साली सुरू झालेल्या ‘अरब स्प्रिंग’ आंदोलनादरम्यान पाश्‍चात्य देशांनी लिबियातील हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांची सत्ता उलथवून लावली होती. यानंतर लिबियन जनतेने गद्दाफी यांना रस्त्यावर खेचून ठार केले होते.

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदावर असलेल्या मदुरो यांचीही अशीच गत होणार असल्याचे संकेत अमेरिकेकडून दिले जात आहेत. पण अमेरिकेच्या विरोधात गेलेले रशिया, चीन, इराण, तुर्की, क्युबा या देशांनी मदुरो यांच्या मागे आपले समर्थन उभे केले आहे. त्याचवेळी व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केलाच, तर त्याचे विपरित परिणाम होतील, असा इशारा या देशांनी दिला आहे.

या घडामोडींमुळे व्हेनेझुएलात अमेरिका व मित्रदेशांच्या आघाडीचा मदुरोसमर्थक देशांबरोबर घनघोर संघर्ष सुरू होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे व्हेनेझुएला ‘लॅटिन अमेरिकेतील सिरिया’ बनेल, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

 

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info