Breaking News

वायुसेनेने ‘बालाकोट’चे पुरावे दिले

नवी दिल्ली – बालाकोटमधील हल्ल्यात आपले काहीच नुकसान झाले नाही, असे दावे करणार्‍या पाकिस्तान व पाकिस्तानच्या समर्थकांसह आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही वायुसेनेने चपराक लगावली. २६ फेब्रुवारीच्या या हल्ल्याच्या आधीचे व नंतरचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स वायुसेनेने सरकारकडे सुपूर्द केले. प्रसिद्ध झालेल्या या फोटोग्राफ्समध्ये वायुसेनेचा हवाई हल्ला अचूक होता व त्यात इथल्या दहशतवादी तळाची मोठी हानी झाल्याचे उघड होत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे इथल्या इमारतींचे छप्पर शाबूत असल्याचे सांगून हा हल्ला प्रभावी ठरला नाही, असा दावा करीत होते. पण हल्ल्यासाठी ‘स्पाईस २०००’ या स्मार्टबॉम्बचा वापर झाला व याने छप्पर उडविण्यापेक्षा इमारतीच्या आत विध्वंस माजविला, ही बाब भारतीय विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

२६ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेने ‘बालाकोट’ येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर हल्ला चढविला. हा हल्ला कमालीचा यशस्वी ठरल्याची घोषणा वायुसेना व सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने इथे काहीही झालेले नाही, असे सांगून भारताचे यश व आपले अपयश झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

त्याला आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही पुरेपूर साथ दिली. हल्ला झाला त्या बालाकोटमधील ‘जैश’च्या प्रशिक्षण तळाच्या इमारती जशाच्या तशा आहेत, असे सांगून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. याचा हवाला देऊन पाकिस्तानी सरकार, लष्कर व माध्यमांनी भारताच्या विरोधात जोरदार प्रचारमोहीम छेडली होती. भारत खोटे बोलून आपला पराक्रम सिद्ध करू पाहत आहे, असा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. २०१६ साली भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानने अशीच भूमिका घेतली.

मात्र यावरून सुरू असलेल्या वादाला वायुसेनेने पूर्णविराम दिला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या लष्करी उपग्रहाच्या फोटोग्राफ्समधून याबाबतची माहिती उघड झाली. हल्ल्यासाठी भारताने आपल्या ‘मिराज २०००’ लढाऊ विमानातून ‘स्मार्ट, प्रिसाईस् इम्पॅक्ट अँड कॉस्ट ईफेक्टीव्ह’ म्हणजेच ‘एसपीआयसीई-स्पाईस’ ‘लेझर गायडेड’ बॉम्बचा वापर केला. हा बॉम्ब योग्य ठिकाणी पडला व त्याचा अपेक्षित परिणामही झाला. ‘स्पाईस २०००’ हा बंकर बर्स्टर बॉम्ब अर्थात बंकर उध्वस्त करणारा बॉम्ब म्हणून ओळखला जातो. प्रतिकूल हवामानातही अचूक मारा करण्यासाठी हा बॉम्ब प्रसिद्ध आहे. या बॉम्बने इमारतीच्या छप्परावर पडलेले भगदाड फोटोग्राफ्समध्ये दिसते. पण उरलेले छप्पर तसेच असल्याचे दाखवून या हल्ल्यात फार मोठे नुकसान झाले नाही, असा दावा केला जातो. पण तो सर्वथा चुकीचा असल्याचे विश्‍लेषक लक्षात आणून देत आहे. हा बॉम्ब अचूक मारा करणारा असून छप्पर उडविण्यापेक्षा आत भगदाड पाडून आतमध्ये भयंकर विध्वंस माजविण्याची जबरदस्त क्षमता या बॉम्बकडे आहे. त्यामुळे या इमारतीत उपस्थित असलेला कुणीही जिवंत राहण्याची शक्यताच नाही, असा दावा भारतीय विश्‍लेषकांनी केला आहे.

तरीही या ठिकाणी प्रेते आढळली नाहीत. कारण पाकिस्तानी लष्करने अल्पावधीतच या परिसराचा ताबा घेतला आणि तो भाग निर्मनुष्य करण्यात आला. इथे तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आणि त्यामध्ये असलेल्या सर्वांचे मोबाईल पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले. या ठिकाणी कित्येक जणांचे शव आपण पाहिल्याचा दावा प्रत्यक्षदर्शिंनी काही विदेशी पत्रकारांकडे केला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info