सिरियातील इराणच्या तळावरील इस्रायलच्या हल्ल्यात उत्तर कोरिया, बेलारूसचे शास्त्रज्ञ ठार

सिरियातील इराणच्या तळावरील इस्रायलच्या हल्ल्यात उत्तर कोरिया, बेलारूसचे शास्त्रज्ञ ठार

तेल अविव – गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियातील ‘मसयाफ’ येथील लष्करी तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्यात बेलारूस आणि उत्तर कोरियातून आलेले दोन शास्त्रज्ञ ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हे शास्त्रज्ञ सिरियातील इराणच्या क्षेपणास्त्रनिर्मिती प्रकल्पाच्या भेटीवर असताना हा हल्ला झाला, अशी माहिती इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाशी संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. इस्रायली संकेतस्थळाचा हा दावा बेलारूसने फेटाळला आहे. पण सिरियातील अस्साद राजवटीला आपले पूर्ण समर्थन असल्याचे बेलारूसने जाहीर केले आहे.

इस्रायली संकेतस्थळ, हवाई हल्ला, मसयाफ, शास्त्रज्ञ, समर्थन, WW3, सिरिया, बेलारूस, हिजबुल्लाह गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलच्या विमानांनी सिरियाच्या ‘हमा’ प्रांतातील ‘मसयाफ’ शहरावर हल्ले चढविले होते. ‘मसयाफ’ येथे सिरियन लष्कराचा मोठा तळ आहे. या तळाच्या एका भागात भिंत उभारून इराणनेदेखील आपला लष्करी तळ व दुसर्‍या भागात क्षेपणास्त्रांचा कारखाना उभारल्याचा दावा इस्रायलने दोन महिन्यांपूर्वीच केला होता. गेल्या आठवड्यात इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्यात ‘मसयाफ’ येथील इराणच्या या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले होते. या तळावर तैनात इराणचे जवान तसेच हिजबुल्लाहचे दहशतवादी सदर हल्ल्यात ठार झाल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटना तसेच सिरियातील अस्सादविरोधी बंडखोरांनी केला होता.

या हल्ल्याच्या काही तासानंतर ‘मसयाफ’ येथील हवाई हल्ल्यात इराणचे बरेच सैनिक ठार झाल्याची माहितीही समोर आली होती. याबाबत सिरिया तसेच इराणने प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण या हल्ल्याच्या दोन दिवसानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सिरियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष ‘बशर अल-अस्साद’ यांची भेट घेतली. त्यामुळे ‘मसयाफ’ येथील हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याच्या दाव्यांना बळ मिळाले होते.

अशा परिस्थितीत, इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाशी संबंधित एका संकेतस्थळाने ‘मसयाफ’वरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती प्रसिद्ध केली. ‘सिरियाच्या मसयाफ येथील कारखान्यातील वेगवेगळ्या इमारतींमध्ये बेलारूस आणि उत्तर कोरियातून आलेल्या तज्ञ शास्त्रज्ञांचे काम सुरू होते’, असे या संकेतस्थळाने म्हटले आहे. याआधीही ‘मसयाफ’ तळावर इस्रायलने हल्ला चढविला होता. पण यावेळी चढविलेला हल्ला कित्येकपटीने तीव्र होता. या हल्ल्यात येथील लष्करी तळाची पूर्णपणे नासधूस झाल्याचा दावा इस्रायली संकेतस्थळाने केला.

दरम्यान, इस्रायली संकेतस्थळाच्या या दाव्याला पुष्टी मिळालेली नाही. पण याआधीही इस्रायलने सिरियातील इराण, हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले चढविले होते. कालांतराने याची माहिती उघड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी जो कुणी इस्रायलसाठी धोकादायक ठरेल, त्यांच्यासाठी इस्रायल अधिक धोकादायक बनेल, असे सांगून यापुढेही सिरियावर हल्ले सुरू राहतील, असे सूचक विधान केले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info