Breaking News

युके्रनच्या निवडणूक निकालाने पाश्‍चिमात्यांना धक्का – रशियासमर्थक नेते झेलेन्स्की सत्तेवर

मॉस्को/किव्ह – रविवारी युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विनोदी अभिनेते ही ओळख असलेल्या ‘वोलोदिमिर झेलेन्स्की’ यांनी प्रतिस्पर्धी पेट्रो पोरोशेन्को यांच्यावर मात केली. यामुळे पोरोशेन्को यांच्यामागे?आपले सामर्थ्य उभे करणार्‍या अमेरिका व नाटोच्या आघाडीला धक्का बसला आहे. यामुळे पाश्‍चिमात्य देश अस्वस्थ बनल्याचे दिसते. रशियाने मात्र युक्रेनमधील निवडणूक निकालाचे जोरदार स्वागत केले आहे.

रविवारी युक्रेनमध्ये झालेल्या निवडणुकीत ६२ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रविवारी रात्री उशिरा समोर आलेल्या निकालानुसार, ‘आऊटसायडर’ व ‘कॉमेडिअन’ अशी ओळख असलेल्या झेलेन्स्की यांनी तब्बल ७३ टक्क्यांहून अधिक मते मिळवून प्रतिस्पर्धी पेट्रो पोरोशेन्को यांच्यावर मात केली. सध्या राष्ट्राध्यक्ष असणार्‍या पोरोशेन्को यांची संभावना कट्टर रशियाविरोधी व पाश्‍चात्य देशांचे बाहुले अशी करण्यात येत होती. त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीत झालेला प्रचंड भ्रष्टाचार व ढिसाळ प्रशासकीय व्यवस्था हे मुद्दे त्यांच्याविरोधात जाणारे ठरले, असे मानले जाते.

वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिळालेल्या विजयाचे युरोपिय देश व अमेरिकेसह रशियानेही स्वागत केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मतदानापूर्वी रशियाशी सहकार्य करणारी व्यक्ती निवडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या निवडीनंतर पुतिन यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी पंतप्रधान मेदवेदेव यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरते.

‘युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियाबरोबरील संबंध सुधारण्याची चांगली संधी आहे’, असे रशियाचे पंतप्रधान मेदवेदेव यांनी म्हटले आहे. युरोपिय देशांनी झेलेन्स्की यांच्या विजयाचे स्वागत केले असले तरी त्यांनी सत्तेवर आल्यानंतर धोरणात्मक चूक करता कामा नये, असा इशारा दिला. रशियाबरोबर सहकार्यावरून युरोपिय देशांनी झेलेन्स्की यांना हा इशारा दिल्याचे दिसते.

पराभूत झालेल्या पोरोशेन्को यांनी झेलेन्स्की यांच्या विजयानंतर रशियात जल्लोष सुरू झाल्याची टीका केली आहे. या निवडणूक निकालाने युक्रेन पुन्हा आपल्या प्रभावाखाली आल्याची खात्री रशियाला पटलेली आहे. म्हणूनच रशियात हा जल्लोष सुरू झाल्याचे पोरोशेन्को यांचे म्हणणे आहे.

२०१४ साली रशियाने युक्रेनच्या क्रिमिआ चा भूभाग आपल्या ताब्यात घेतला असून पूर्व युक्रेनमधील बंडखोरांना समर्थन दिले आहे. यामुळे युक्रेन व रशियामध्ये प्रचंड तणाव असून पोरोशेन्को यांनी सातत्याने रशियाविरोधी भूमिका घेऊन त्यात भर टाकली होती. पोरोशेन्को यांच्या भूमिकेला अमेरिका व युरोपिय महासंघानेही पाठिंबा दिला होता. त्यांच्या पराभवामुळे महासंघ व अमेरिकेला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागेल, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो.

राष्ट्राध्यक्ष पोरोशेन्को यांच्या कार्यकाळात युक्रेनने रशियाच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारल्याने अमेरिका व युरोपिय देशांना त्याचा धोरणात्मक लाभ मिळाला होता. पण आता परिस्थिती बदलली असून अमेरिका व नाटोला आपले डावपेच बदलणे भाग पडणार आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info