ग्लास्गो – ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर सुरू असणार्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये ‘स्वतंत्र स्कॉटलंड’च्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे दिसत आहे. शनिवारी स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर असणार्या ग्लास्गोमध्ये भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘द ऑल अंडर वन बॅनर’ या नावाने काढण्यात आलेल्या या मोर्च्यात सुमारे ७५ हजार नागरिक सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. गेल्याच आठवड्यात स्कॉटलंडच्या ‘फर्स्ट मिनिस्टर’ निकोला स्टर्जन यांनी ‘स्वतंत्र स्कॉटलंड’साठी निर्णायक लढा सुरू करण्याचा संदेश दिला होता. शनिवारचा मोर्चा त्याचाच भाग मानला जातो.
२०१० सालापासून स्कॉटलंडमध्ये सत्तेवर असलेल्या ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ने ‘स्वतंत्र स्कॉटलंड’ची मागणी सातत्याने व आक्रमकपणे लावून धरली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या सार्वमतात ५५ टक्के नागरिकांनी स्वातंत्र्याचा मुद्दा नाकारला असला तरी ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ने त्याबाबतची आपली भूमिका कायम ठेवली आहे. २०१६मध्ये ब्रिटीश जनतेने युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी स्कॉटलंडच्या जनतेने महासंघाच्या बाजूने मत नोंदविले होते.
त्यानंतर तीन वर्षांचा कालावधी उलटला तरी ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. या प्रक्रियेदरम्यान ब्रिटीश सरकार स्कॉटलंडच्या मागण्यांची योग्य दखल घेत नसल्याचा आरोप स्कॉटिश सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर सरकारबरोबर जाण्याऐवजी युरोपिय महासंघात राहण्यावर भर देऊ, असे स्कॉटलंडच्या सत्ताधार्यांचे म्हणणे आहे. स्कॉटलंडच्या ‘फर्स्ट मिनिस्टर’ निकोला स्टर्जन यांनी गेल्या आठवड्यातील बैठकीत, ‘स्कॉटलंड ब्रेक्झिटसाठी नाही, स्कॉटलंड युरोपसाठीच’, अशी स्पष्ट घोषणाही केली.
या पार्श्वभूमीवर शनिवारी आयोजित करण्यात आलेला मोर्चा व त्याला मिळालेला प्रतिसाद लक्ष वेधून घेणारा ठरतो. मोर्च्याचे आयोजन सत्ताधारी ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’कडून करण्यात आले असले तरी ‘द ऑल अंडर वन बॅनर’ असा फलक झळकावित स्वातंत्र्यासाठी पाठिंबा देणार्या सर्वांचे स्वागत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. शनिवारचा मोर्चा हा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या नव्या व व्यापक मोहिमेची सुरुवात असल्याचे संकेतही आयोजकांनी दिले.
पुढील पाच महिने स्कॉटलंडच्या विविध शहरांमध्ये अशा मोर्च्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात राजधानी एडिंनबर्गमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यात मोहिमेचा पुढील टप्पा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या मोर्च्यादरम्यान युरोपिय संसदेच्या निवडणुकीसाठीही प्रचार सुरू झाल्याचे संकेत देण्यात आले असून ‘स्टॉप ब्रेक्झिट’ असा संदेश छापलेली पत्रके वाटण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस होणार्या या निवडणुकीत ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ला ४० टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |