बीजिंग/वॉशिंग्टन – चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कर लादून अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्ध अधिकच पेटविले आहे. चीनच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय शेअरबाजार कोसळले असून चीनच्या युआन चलनाने चार महिन्यांचा नीचांकी स्तर गाठला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या करांवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून आपला देश यापुढे इतरांसाठी ‘पिगी बँक’ ठरणार नाही, असे ठणकावले. त्याचवेळी चीनकडून अमेरिकेत करण्यात येणार्या संपूर्ण निर्यातीवर कर लादण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यात चीनचे शिष्टमंडळ व्यापारी चर्चेसाठी अमेरिकेत दाखल झाले होते. मात्र दोन दिवसांच्या वाटाघाटींनंतरही अमेरिका-चीन चर्चा फिस्कटली होती. ही चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवरील कर वाढविण्याची धमकी देऊन खळबळ उडवली होती. चीनचे शिष्टमंडळ माघारी परतत असतानाच, अमेरिकेने चीनवर लादलेले नवे कर लागू झाले होते. या करांवर चीनकडून प्रतिक्रिया येत असतानाच ट्रम्प यांनी चीनला पुन्हा लक्ष्य केले होते. चीनने आता जर व्यापारी करार केला नाही तर २०२० सालानंतर त्यांना त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी धमकावले होते.
ट्रम्प यांनी एकामागोमाग एक धक्के दिल्याने चीनला त्याविरोधात कारवाई करणे भाग पडले. सोमवारी रात्री चीनने अमेरिकेकडून करण्यात येणार्या ६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कर वाढविण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानुसार पाच हजारांहून अधिक अमेरिकी उत्पादनांवर १ जूनपासून कर लागू होणार आहेत. हे कर पाच ते २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याचे चीनकडून स्पष्ट करण्यात आले. नैसर्गिक इंधनवायू, पेट्रोकेमिकल्स व फ्रोजन व्हेजिटेबल्ससारख्या सुमारे अडीच हजार अमेरिकी उत्पादनांवर २५ टक्के अतिरिक्त कर लागणार असल्याचे चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले.
चीनच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय शेअरबाजारातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेतील ‘डो जोन्स’ आणि ‘एस ऍण्ड पी’ हे दोन्ही प्रमुख शेअरनिर्देशांक अनुक्रमे ६०० व ५०० अंशांनी कोसळले आहेत. ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण असल्याची माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली. अमेरिकेपाठोपाठ चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, हॉंगकॉंग तसेच युरोपिय व आशियाई शेअरबाजारही कोसळले आहेत. बहुतांश शेअरबाजारांमध्ये ०.२ टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस ही घसरण कायम राहण्याची भीती विश्लेषकांनी व्यक्त केली.
शेअरबाजारांबरोबरच चलन बाजारपेठ व सोन्याच्या दरांमध्येही जोरदार परिणाम दिसून आला. चलन बाजारपेठेत चीनच्या युआन चलनाचे दर डॉलरच्या तुलनेत घसरले असून २०१९मधील नीचांकी स्तर गाठला आहे. हा स्तर युआनसाठी धोक्याचा इशारा असल्याचे सांगण्यात येते. दुसर्या बाजूला शेअरबाजारातील घसरणीने सोन्याच्या दरांनी उसळी घेतली असून आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये प्रति औंस १३०० डॉलर्सच्या वर झेप घेतली आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनने लादलेल्या करांचा समाचार घेताना, अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन केले. अमेरिकेने लादलेल्या करांमुळे देशातील पोलाद उद्योग तसेच शेतकर्यांना दिलासा मिळाला असून यापुढेही तो कायम ठेवण्याची काळजी आपण घेऊ, असे ट्रम्प यांनी बजावले. त्याचवेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध असले तरी व्यापारी तुटीच्या मुद्यावर अमेरिका कदापि माघार घेणार नसल्याचा इशाराही दिला.
सौदीच्या इंधनपाईपलाईनवर हौथी बंडखोरांचे ड्रोन हल्ले
रियाध – सौदी अरेबियाच्या दोन ‘ऑईल प्लॅटफॉर्मस्’वर येमेनमधील हौथी बंडखोरांनी ड्रोनचे हल्ले चढविले. बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले ड्रोन्स या ठिकाणी आदळविल्याची माहिती सौदीचे इंधनमंत्री ‘खालिद अल-फलिह’ यांनी दिली. हौथी बंडखोरांनीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मंगळवारी हौथी बंडखोरांचे नियंत्रण असलेल्या वृत्तवाहिनीने सौदीच्या महत्त्वाच्या ‘ऑईल प्लॅटफॉर्मस्’वर हल्ले चढविल्याची घोषणा केली. पण हे हल्ले कधी आणि कुठे चढविले, याविषयीची माहिती हौथी बंडखोरांनी प्रसिद्ध केलेली नाही. सौदीच्या इंधनमंत्र्यांनीदेखील याबाबतचे तपशील देण्याचे टाळले. मात्र हौथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर मोठी दुर्घटना घडू नये यासाठी ‘अरमाको’ या सौदीच्या इंधन उत्पादक कंपनीने इंधन पुरवठा रोखला आहे.
दोन महिन्यांपूर्वीदेखील हौथी बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन्सद्वारे सौदीत हल्ले चढविले होते. हौथी बंडखोरांनी हे ड्रोन्स इराणकडून मिळविल्याचे पुरावे सौदी व अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले होते. दरम्यान, रविवारी सौदीच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांसाठी देखील इराण व हौथी बंडखोरांकडे संशयाने पाहिले जाते. पण अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |