स्कॉट मॉरिसन पुन्हा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बनल्याने ऑस्ट्रेलिया व चीन संबंध चिघळणार

स्कॉट मॉरिसन पुन्हा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बनल्याने ऑस्ट्रेलिया व चीन संबंध चिघळणार

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील निवडणुकांमध्ये ‘लिबरल’ पक्षाचे स्कॉट मॉरिसन यांची पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड चीनसाठी मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया चिनी प्रसारमाध्यमांमधून उमटली होती. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातील ‘चिनी’ गुंतवणूक तब्बल ५० टक्क्यांनी घसरल्याचा अहवाल समोर आला असून ही बाब ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल, असे संकेत ऑस्ट्रेलियातूनच देण्यात येत आहेत. आर्थिक गुंतवणुकीपाठोपाठ चीन इतर क्षेत्रातही ऑस्ट्रेलियाला धक्के देण्याचा प्रयत्न करेल, असे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध अधिकच चिघळण्याची शक्यता दिसू लागली आहे.

‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी’ने चीनच्या गुंतवणुकीवर एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात चीनने २०१८ साली ऑस्ट्रेलियात फक्त ३.३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची माहिती दिली आहे. ही गुंतवणूक ऑस्ट्रेलियातील ‘चिनी’ गुंतवणुकीचा पाच वर्षातील नीचांक असल्याचेही सांगण्यात आले. २०१६ साली चीनने ऑस्ट्रेलियात १० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करून गुंतवणुकीचा उच्चांक गाठला होता. मात्र २०१७ सालापासून घसरण सुरू झाली असून २०१८ साली थेट नीचांकापर्यंत गुंतवणूक घसरल्याचे समोर आले आहे.

२०१७ साली ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी चीनविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियातील चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी करण्यात आलेला कायदा व ‘हुवेई’वर टाकलेली बंदी यासारखे निर्णय घेऊन टर्नबूल यांनी चीनच्या प्रभावाला पायबंद घातला होता. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने ‘स्टेप अप पॅसिफिक’ सारखे धोरण जाहीर करून चीनच्या पॅसिफिकमधील विस्ताराला उघड आव्हान दिले होते. टर्नबूल यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या स्कॉट मॉरिसन यांनीही त्याचाच कित्ता गिरवित चीनविरोधात रोखठोक भूमिका घेतली होती.

ऐन निवडणूक प्रचारात मॉरिसन यांनी अमेरिका-चीन संबंधांवर भाष्य करताना अमेरिका हा मित्रदेश तर चीन ‘ग्राहक’ असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवली होती. चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असतानाही ऑस्ट्रेलियन नेतृत्त्वाने केलेली ही संभावना चीनला चांगलीच झोंबली होती. टर्नबूल व मॉरिसन यांच्या विरोधी निर्णयांना प्रत्युत्तर देणार्‍या चीनने राजनैतिक पातळीवरील सहकार्य कमी केले होते. तसेच ऑस्ट्रेलियातून होणारी कोळशाची आयातही स्थगित केली होती.

मॉरिसन यांच्या फेरनिवडीनंतर अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञ ऑस्ट्रेलियाने चीनबाबतचे आपले धोरण सौम्य करावे, असे आवाहन करीत आहेत. मात्र मॉरिसन यांनी त्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी चीन प्रसारमाध्यमांच्या मार्फत ऑस्ट्रेलियन सरकारवर दडपण आणण्याचे प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही दिवसात चिनी तसेच ऑस्ट्रेलियन माध्यमांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येत आहे. पंतप्रधानपदी फेरनिवड झालेल्या मॉरिसन यांनी धोरण बदलावे यासाठी चीन एखादा धक्का देण्याचा प्रयत्न करेल, असे दावेही करण्यात येत आहेत. मात्र तसे झाल्यास ऑस्ट्रेलियाकडून अधिक तीव्र प्रतिक्रिया येऊन दोन देशांमधील संबंध अधिकच चिघळू शकतात, असे संकेत सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info