पश्तू जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पाकिस्तानात दुसरा बांगलादेश तयार होईल- विरोधी पक्षनेते बिलावल भुत्तो

पश्तू जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पाकिस्तानात दुसरा बांगलादेश तयार होईल- विरोधी पक्षनेते बिलावल भुत्तो

मिरानशहा/इस्लामाबाद  – ‘पश्तून तह्फूज मुव्हमेंट’ (पीटीएम) या पश्तू जनतेच्या अधिकारांची मागणी करणार्‍या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका इस्लामाबाद हायकोर्टात सादर केली जात आहे. ‘पीटीएम’च्या चळवळीमागे नक्की कोण आहे? असा प्रश्‍न पाकिस्तानची माध्यमे विचारू लागली आहेत. भारत व अमेरिका ‘पीटीएम’ला मदत करीत असल्याचे आरोपही सुरू झाले आहेत. मात्र पश्तू जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर दुसरा बांगलादेश तयार होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते बिलावल भुत्तो यांनी दिला आहे.

पश्तू, मागणी, पश्तून तह्फूज मुव्हमेंट, बांगलादेश, आरोप, WW3, इस्लामाबाद, मौलाना फझलूरपाकिस्तानचे लष्कर ‘पीटीएम’च्या विरोधात आक्रमक कारवाई करणार असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने जाहीर केले. ही चळवळ देशद्रोही असल्याचा आरोप करून पाकिस्तानची माध्यमेही लष्कराची बाजू उचलून धरत आहेत. ‘पीटीएम’चे दिवस भरले, असे पाकिस्तानी लष्कराचे ‘डीजीआयएसपीआर’ मेजर जनरल असिफ गफूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. यानंतर अल्पावधितच पाकिस्तानी लष्कर व सुरक्षा यंत्रणांच्या अन्यायकारक कारवायांचे सत्र सुरू झाले. राजधानी इस्लामाबादमध्ये एका पश्तू अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या विरोधात पश्तू जनता निदर्शने करीत होती. या निदर्शकांवर पाकिस्तानी लष्कराने शनिवारी केलेल्या कारवाईत ४० जण जबर जखमी झाल्याचे सांगितले जात होते.

पण आता या करवाईत दहा जणांचा बळी गेल्याचे समोर येत आहे. यावर पश्तू जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. उत्तर वझिरिस्तानातील काही भागातील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ले चढविले. या संघर्षात २० जण जखमी झाले आहेत. हे पश्तू हल्लेखोर सशस्त्र होते, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला होता. मात्र जखमी झालेले तथाकथित हल्लेखोर ‘पीटीएम’चे सदस्य असून आपल्या हातात शस्त्रे नव्हती, असे या जखमींनी सांगितले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने आपले आरोप मागे घेतले. पण ‘पीटीएम’च्या दोन नेत्यांना अटक करून या घटनेचे खापर पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर फोडण्याची तयारी केली आहे.

हे दोन नेते पाकिस्तानी संसदेचे सदस्य होते. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी पश्तू जनतेचा विश्‍वासघात केला असा ठपका ठेवून या दोघांनीही संसदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर या दोघांना झालेली अटक राजकीय सूडबुद्धीचा भाग असू शकतो, असे बोलले जाते. त्याचवेळी पाकिस्तानच्या अशा अत्याचारांनी हैराण झालेली पश्तू जनता आता थेट पाकिस्तानपासून स्वातंत्र्याचीच मागणी करीत आहे. अशी मागणी करणार्‍या ‘पीटीएम’च्या मंझूर पश्तीन या तरुण नेत्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून ‘पीटीएम’वर आक्रमक कारवाईच्या घोषणा दिल्या जात आहेत.

मात्र पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईला विरोधी पक्षनेत्यांचा विरोध असल्याचे दिसते. ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’चे (पीपीपी) नेते बिलावल भुत्तो यांनी शांततेने निदर्शने करण्याचा अधिकार पश्तू जनतेला आहे, असे म्हटले आहे. जर पश्तू जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर बांगलादेशची पुनरावृत्ती होईल, असा सज्जड इशारा भुत्तो यांनी पाकिस्तानचे सरकार व लष्कराला दिला. तर ‘पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ’च्या (पीएमएल-एन) नेत्या मरियम नवाझ यांनीही लष्कराच्या कारवाईबाबतचे सत्य जगजाहीर करा, अशी मागणी केली. तर मौलाना फझलूर रेहमान यांनी पाकिस्तानी सरकार व लष्कराच्या कारवाईमुळे पश्तू जनतेच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याचे म्हटले आहे.

यामुळे पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तानी लष्करावरील दडपण वाढत चालले आहे. पण सध्या तरी याबाबतच्या बातम्या दडपून लष्कर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. यामुळे पश्तू जनता पाकिस्तानच्या मुख्य प्रवाहापासून अधिकाधिक दूर चालली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info