‘कोरोनाव्हायरस’ जागतिक महामारी – जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

‘कोरोनाव्हायरस’ जागतिक महामारी – जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

जीनिव्हा – आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशांनी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे ‘कोरोनाव्हायरस’चे संकट अधिकच तीव्र झाले असून ही जागतिक महामारी बनली आहे, अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली. जीनिव्हामधील बैठकीत ही घोषणा करतानाच, ‘कोरोनाव्हायरस’चा फैलाव व वाढती तीव्रता यामुळे आरोग्य संघटना चिंतित असल्याचेही सांगण्यात आले. डिसेंबर महिन्यात चीनच्या ‘वुहान’ शहरातून सुरू झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीने आतापर्यंत ४,७२९ जणांचा बळी गेला आहे.

यापूर्वी २००९ साली आलेल्या ‘स्वाईन फ्ल्यू’च्या साथीला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आले होते. मेक्सिकोतून सुरू झालेल्या या साथीने जगभरात दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला होता. या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला होता. त्यानंतर आफ्रिकेत २०१४ साली आलेल्या ‘एबोला’च्या साथीला ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र चीनमधून सुरू झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’ला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आरोग्य संघटनेकडून टाळाटाळ करण्यात येत होती.

गेल्या दोन आठवड्यात ‘कोरोनाव्हायरस’ची साथ प्रचंड वेगाने पसरण्यास सुरुवात झाली होती. विशेषतः युरोप, अमेरिका, आखाती देशांमध्ये हा आजार प्रचंड वेगाने पसरण्यास सुरुवात झालू होती. बुधवारपर्यंत जगातील १२५ देशांमध्ये ‘कोरोनाव्हायरसची साथ फैलावल्याचे समोर आले असून तब्बल १ लाख २५ हजारांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. इटली, अमेरिका, इराण, दक्षिण कोरिया यासह जवळपास आठ देशांमध्ये या साथीचे एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेला ‘कोरोनाव्हायरस’ ही जागतिक महामारी असल्याचे जाहीर करणे भाग पडल्याचे मानले जाते. ‘कोरोनाव्हायरस’ला जागतिक महामारी घोषित करून त्याची तीव्रता जगाच्या कानाकोपर्‍यात पसरल्याची कबुलीच जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याचे मानले जाते. चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची लागण ८० हजारांहून अधिक जणांना झाली असून ३,१६९ जणांचा बळी गेला आहे. चीनपाठोपाठ युरोपमधील इटली या जागतिक महामारीचे केंद्र बनला असून या देशातील बळींची संख्या ९००च्या जवळ पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या माहितीनुसार, १२५ देशांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’ची साथ पसरली असून अमेरिकेच्या किनारपट्टीवर दाखल झालेल्या एका प्रवासी जहाजातही त्याचे रुग्ण आढळले आहेत. युरोपिय देशांमधील रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली असून आखाती देशांमध्ये १० हजारांहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येते. दक्षिण कोरिया, जपान, फिलिपाईन्स या देशांनी ‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्यासाठी देशात ‘इमर्जन्सी’ जाहीर केली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info