रशिया युरोपचा इंधनवायू पुरवठा तोडू शकतो

-‘आयईए'च्या प्रमुखांचा इशारा

रशिया युरोपचा इंधनवायू पुरवठा तोडू शकतो

पॅरिस/मॉस्को – युक्रेन संघर्षात आपले स्थान मजबूत करण्यासाठी रशिया युरोपचा इंधनवायू पुरवठा पूर्णपणे तोडू शकतो, असा इशारा ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’चे (आयईए) प्रमुख फातिह बिरॉल यांनी दिला. बिरॉल यांच्या इशाऱ्याला युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. रशियाकडून टोकाच्या निर्णयाची शक्यता लक्षात घेऊन युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीने इंधनक्षेत्रात ‘अलार्म स्टेज’ची घोषणा केली आहे. गेल्याच आठवड्यात रशियाने जर्मनीसह युरोपातील काही आघाडीच्या देशांचा इंधनपुरवठा कमी केल्याचे समोर आले होते.

इंधनवायू पुरवठा,‘इंधनवायु पुरवठ्याच्या मुद्यावरून रशिया अनेक सबबी पुढे करु शकते. वेगवेगळी कारणे सांगून युरोपचा इंधनवायू पुरवठा कमी केला जाऊ शकतो. कदाचित रशिया युरोपचा इंधनवायू पुरवठा पूर्णपणे तोडूही शकतो. त्यामुळे युरोपिय देशांनी आपत्कालिन योजना तयार ठेवायला हवी’, असा इशारा ‘आयईए’चे प्रमुख फातिह बिरॉल यांनी दिला. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनक्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत व्हावे यासाठी रशिया इंधनपुरवठा तोडण्याचे पाऊल उचलू शकतो, असा दावाही त्यांनी केला. युरोपिय देशांना हिवाळ्याच्या कालावधीत अधिक इंधनवायू पुरवठ्याची गरज भासते, हे लक्षात घेऊन रशियाने अशा प्रकारची खेळी केली असावी, याकडेही बिरॉल यांनी लक्ष वेधले.

बिरॉल यांच्यापाठोपाठ युरोपिय महासंघाचे ‘क्लायमेट पॉलिसी चीफ’ फ्रँक टिमरमॅन्स यांनीही रशियाकडून इंधनपुरवठा बंद होण्याचे वक्तव्य केले आहे. रशियाने अनेक युरोपिय देशांचा इंधनपुरवठा घटविला असून महासंघाच्या 10 सदस्य देशांनी आपत्कालिन योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. मात्र रशियन इंधनपुरवठा पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका अधिकच वाढला आहे, असे टिमरमॅन्स यांनी बजावले. रशिया इंधनाचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जागतिक इंधनक्षेत्रातील रशियाचा हिस्सा जवळपास 10 टक्के आहे. कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायूव्यतिरिक्त रशिया हा कोळशाचाही आघाडीचा निर्यातदार देश आहे. युरोप खंडाच्या एकूण इंधनाच्या मागणीपैकी 30 टक्क्यांहून अधिक गरज एकट्या रशियाकडून पूर्ण केली जाते. यासाठी युरोपिय महासंघ रशियाला दरवर्षी 400 अब्ज युरोहून अधिक रक्कम मोजतो. जर्मनीसारखा आघाडीचा देश रशियन इंधनपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळेच युक्रेन युद्धाला साडेतीन महिने उलटल्यानंतरही युरोपिय देश रशियाच्या इंधनक्षेत्रावर पूर्ण निर्बंध लादू शकलेले नाहीत. या मुद्यावर आपण हतबल असल्याचे जर्मन नेतृत्त्वाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, इंधनवायुच्या पुरवठ्यात घट झाल्याने जर्मनीने इंधनक्षेत्रात ‘क्रायसिस’ निर्माण झाल्याचे जाहीर केले. सध्या जर्मनीतील इंधनवायुचे राखीव साठे 58 टक्क्यांपर्यंत भरलेले असले तरी हिवाळ्यापर्यंत 90 टक्के क्षमतेचे लक्ष्य पूर्ण होणार नसल्याचे जर्मन सरकारने बजावले. इंधनपुरवठ्यात केलेली कपात हा रशियाने जर्मनीवर केलेल्या आर्थिक हल्ला आहे, असा दावा जर्मनीचे वाणिज्यमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info