तेहरान/मक्का – ‘अमेरिकेने पर्शियन आखातातील इराणच्या जहाजांवर एक जरी ‘बुलेट’ फायर केली तर इंधनाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्याही पलीकडे जातील. असे झाले तर ही दरवाढ अमेरिका, युरोप आणि जपान व दक्षिण कोरियासारख्या अमेरिकेच्या मित्रदेशांना असह्य होईल’, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या वरिष्ठ लष्करी सल्लागाराने दिला. त्याचबरोबर पर्शियन आखातातील अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या टप्प्यात असल्याचेही या अधिकार्याने बजावले.
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या आयातुल्ला खामेनी यांचे लष्करी सल्लागार ‘मेजर जनरल याह्या रहिम सफायी’ यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेला धमकावले. इराणच्या सागरी क्षेत्राजवळ दाखल झालेल्या अमेरिकेच्या युद्धनौका सुरक्षित नाहीत, असे मेजर जनरल सफायी म्हणाले. ‘पर्शियन आखातात तैनात असलेल्या अमेरिका आणि मित्रदेशांच्या युद्धनौका इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्सची क्षेपणास्त्रे आपल्या युद्धनौकांवर रोखलेली असून अमेरिकेला याची पूरेपूर कल्पना आहे’, असे मेजर जनरल सफायी यांनी सांगितले.
‘म्हणूनच इराणच्या क्षेपणास्त्रांची क्षमता ठाऊक असणार्या अमेरिकेने इराणवर हल्ला चढविण्याची घोडचूक करू नये. कारण अमेरिकेचा इराणवरील हल्ला आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमती १०० डॉलर्सच्या पलीकडे घेऊन जाईल’, अशी धमकी मेजर जनरल सफायी यांनी दिली. असे झाले तर यापुढील परिणाम अमेरिका, युरोप व दक्षिण कोरिया आणि जपानला सहन होणार नाहीत, असा दावा सफायी यांनी केला. अमेरिका, युरोप, दक्षिण कोरिया आणि जपान हे देश मोठ्या प्रमाणात आखातातील इंधनावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्शियन आखातात युद्ध पेटले तर अमेरिका व मित्रदेशांची कोंडी होईल, याची जाणीव मेजर जनरल सफायी यांनी करून दिली.
सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याकडे इराणचे सर्वाधिकार एकवटलेले आहेत. त्यामुळे खामेनी यांच्या लष्करी सल्लागाराने दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ५३ डॉलर्सच्या आसपास आहेत. अमेरिका व इराणमध्ये संघर्ष पेटण्याची स्थिती निर्माण झालेली असताना, इंधनाचे दर कडाडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पण इंधनाचे दर भडकू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याची घोषणा सौदी अरेबिया आणि ‘संयुक्त अरब अमिराती’ने (युएई) ओपेकच्या बैठकीत केली. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून पर्शियन आखातातील इराणच्या हालचाली इंधनाच्या दरवाढीला जबाबदार ठरत असल्याची टीका सौदी अरेबिया करीत आहे. मक्का येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना सौदीचे राजे सलमान यांनी हा आरोप केला होता.
गेल्या महिन्यात ‘युएई’च्या किनारपट्टीजवळ चार इंधनवाहू जहाजांवर झालेल्या घातपाती हल्ल्यामागे इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा ठपका सौदीचे राजे सलमान यांनी ठेवला आहे. तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या या कारवाया फक्त सौदी अरेबिया किंवा आखाती देशांसाठीच धोकादायक नाहीत. या सागरी क्षेत्रातून निर्यात केली जाणारी इंधनाची वाहतूकदेखील इराणमुळे धोक्यात येऊ शकते, याकडे सौदीचे राजे सलमान यांनी लक्ष वेधले होते.
दरम्यान, इराण व इराणसंलग्न संघटना इंधनवाहू जहाजांवर हल्ले चढवून इंधनाचे दर वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे इराणने दिलेली धमकी व सौदीच्या राजांनी व्यक्त केलेली चिंता निराळे संकेत देत आहेत. यामुळे इंधनाच्या दरावर होणारे परिणाम व त्याचा प्रमुख देशांवर येणारा ताण याचे भीषण परिणाम नजिकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |