मॉस्को – रशियन नौदलातील सर्वात विध्वंसक आणि ‘सिक्रेट वेपन’ म्हणून ओळखली जाणारी ‘लोशॅरिक’ आण्विक पाणबुडीवर आग भडकून झालेल्या दुर्घटनेत १४ नौसैनिकांचा बळी गेला. या घटनेनंतर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्या सर्व भेटीगाठी रद्द करून संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकार्यांची तातडीची बैठक घेतली. ही घटना म्हणजे रशियासाठी सर्वात मोठे नुकसान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली. विशेष मोहिमेवर असणार्या पाणबुडीला लागलेली आग संशयास्पद असल्याचा दावा केला जातो.
रशियाच्या उत्तरेकडील ‘बॅरेन्ट्स सी’च्या क्षेत्रात असताना सोमवारी ‘एएस-१२ लोशॅरिक’ पाणबुडीवर आग लागल्याची पहिली माहिती रशियन संरक्षणदलाला मिळाली. या आगीत पाणबुडीवरील १४ नौसैनिक ठार झाले. आगीच्या धुरामुळे गुदमरून नौसैनिकांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याशी तातडीने बैठक घेऊन वेस्टर्न कमांडच्या प्रमुखांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर रशियन संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकार्यांचीही भेट घेतली.
‘लोशॅरिक’ पाणबुडीला लागलेल्या या आगीबाबत सुरुवातीला गुप्तता राखण्यात आली होती. मंगळवारी याची माहिती माध्यमांमध्ये उघड करण्यात आली. ‘लोशॅरिक’ पाणबुडीला लागलेल्या आगीचे कारण व संबंधित माहिती अतिशय गोपनीय असून ती सार्वजनिक करता येणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले. पाणबुडीची आग विझवल्यानंतर रशियन विनाशिकेच्या सहाय्याने सदर पाणबुडी ‘सेवेरोमोर्स्क’ येथील बंदरावर आणण्यात आली.
‘लोशॅरिक’ ही रशियन नौदलातील सर्वात विध्वंसक पाणबुडी मानली जाते. या पाणबुडीचा वापर आर्क्टिक क्षेत्रातील संशोधनासाठी केला जातो. अणुऊर्जेवर चालणारी ही पाणबुडी रशियाच्या संरक्षणदलातील सर्वात सिक्रेट हत्यार म्हणून ओळले जाते. रशियाच्या संरक्षणदलात या पाणबुडीला ‘गुगी’ या टोपण नावाने ओळखले जाते. तसेच या पाणबुडीचे रिपोर्टिंग नौदलाऐवजी रशियाच्या मुख्य गुप्तचर यंत्रणेला केले जात होते. यावरून ‘लोशॅरिक’ पाणबुडी रशियन संरक्षणदलासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे सिद्ध होते, असा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |