अमेरिका मेक्सिकोतील ‘ड्रग कार्टेल्स’ना दहशतवादी घोषित करणार – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन/मेक्सिको सिटी, दि. २७ (वृत्तसंस्था) – मेक्सिकोतील ‘ड्रग कार्टेल्स’ना लवकरच दहशतवादी म्हणून घोषित केले जाईल. त्यासाठीची प्रक्रिया मी तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे अमेरिका नजिकच्या काळात मेक्सिकोतील ‘वॉर अगेन्स्ट ड्रग्ज्’चे रुपांतर ‘वॉर ऑन टेरर’मध्ये करेल, असे संकेत मिळत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात ‘युद्ध’ पुकारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन केले होते. मेक्सिकोतील ‘ड्रग कार्टेल्स’कडून अमेरिकी नागरिकांची हत्या झाल्यानंतर आक्रमक झालेल्या ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. याबद्दल अधिक माहिती देताना ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सरकारने सुरू केलेल्या कारवाईला अमेरिका अधिकाधिक सहाय्य पुरवेल, असे सांगितले होते.

मात्र मेक्सिकन ‘ड्रग कार्टेल्स’ना दहशतवादी जाहीर करण्याची तयारी हे ट्रम्प यांनी उचललेले आक्रमक पाऊल मानले जाते. यापूर्वी मेक्सिकोतून अमेरिकेत घुसखोरी करणार्‍या निर्वासितांवर टीका करतानाही ट्रम्प यांनी त्यातून अमली पदार्थांच्या व्यापार करणार्‍या टोळ्यांचे सदस्य घुसत असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेत मेक्सिकन सीमेवरून होणार्‍या घुसखोरीत ‘ड्रग कार्टेल्स’चा सहभाग असल्याचेही यापूर्वीच्या घटनांमधून समोर आले होते.

त्याचवेळी मेक्सिकोलाही ‘ड्रग कार्टेल्स’च्या हिंसाचाराचा मोठा फटका बसत असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या टोळ्यांकडून करण्यात येणार्‍या हिंसक कारवायांमध्ये तब्बल २९ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. २०१९ सालच्या पहिल्या १० महिन्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या असून हा हिंसाचार म्हणजे ‘अमली दहशतवाद’ असल्याचा गंभीर इशारा मेक्सिकन अधिकार्‍यांनी दिला. होता.

मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचे जबरदस्त वर्चस्व आहे. मेक्सिकोत अशी १० प्रमुख ‘कार्टेल्स’ असून त्यातील पाचहून अधिक कार्टेल्सच्या प्रमुखांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र अशा प्रकारच्या कारवाईनंतरही मेक्सिकोतील हिंसेचे सत्र थंडावले नसल्याचे गेल्या काही आठवड्यातील घटनांवरून दिसून आले आहे.

अमेरिकेच्या संसदेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या १२ वर्षात मेक्सिकोत झालेल्या हत्यांपैकी दीड लाखांहून अधिक हत्या या फक्त अमली पदार्थांच्या तस्करीशी जोडलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित होत्या. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिकोतील ‘ड्रग कार्टेल्स’ना दहशतवादी म्हणून घोषित करण्याबाबत दिलेले संकेत लक्ष वेधून घेणारे ठरते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info