फ्रान्सच्या ‘डिजिटल टॅक्स’विरोधात अमेरिकेकडून व्यापारयुद्धाचा इशारा

फ्रान्सच्या ‘डिजिटल टॅक्स’विरोधात अमेरिकेकडून व्यापारयुद्धाचा इशारा

वॉशिंग्टन – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांकडून मिळविण्यात येणार्‍या प्रचंड उत्पन्नावर कर लादण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. गुरुवारी फ्रेंच संसदेने अमेरिकेतील ‘गुगल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘अ‍ॅपल’, ‘फेसबुक’ व ‘मायक्रोसॉफ्ट’ यांच्यासह इतर कंपन्यांवर तीन टक्के कर लादणारे विधेयक मंजूर केले. फ्रेंच संसदेच्या या विधेयकावर अमेरिकेने आधीच नाराजी व्यक्त केली असून त्याविरोधात कर लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या इशार्‍यामुळे अमेरिका व फ्रान्सदरम्यान व्यापारयुद्ध भडकण्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून जगभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांकडून मिळविण्यात येणारे उत्पन्न, त्यांचा नफा व करचुकवेगिरी हा मुद्दा सातत्याने चर्चिला जात आहे. युरोपिय महासंघाने यावर आग्रही भूमिका घेतली असली तरी सदस्य देशांमधील मतभेदांमुळे अशा कंपन्यांवर कर लादण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला ‘बिग टेक’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांकडून बाजारपेठेत एकाधिकारशाही गाजविण्याच्या प्रयत्नांवरही टीकास्त्र सोडले जात आहे.

फ्रेंच संसदेने मंजूर केलेल्या विधेयकानुसार, जागतिक पातळीवर ७५ कोटी युरोंहून अधिक उत्पन्न असणार्‍या व फ्रान्समध्ये किमान अडीच कोटी युरो महसूल असणार्‍या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर तीन टक्के कर लादण्यात येईल. कराची अंमलबजावणी वर्षाच्या सुरुवातीपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. या करातून सरकारला दरवर्षी ५० कोटी युरोचे उत्पन्न मिळेल, असा दावा संसदेत मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आला आहे.

फ्रेंच सरकारच्या या करावर अमेरिकेने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली असून कारवाईचा इशारा दिला आहे. अमेरिकचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथायझर यांनी फ्रान्सकडून अमेरिकी कंपन्यांवर लादण्यात येणार्‍या करांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. फ्रान्स सरकारचा कर अमेरिकी कंपन्यांना लक्ष्य करूनच आखण्यात आल्याचा आरोपही अमेरिकी प्रतिनिधींनी केला. अमेरिकी घटनेच्या ‘सेक्शन ३०१’नुसार फ्रान्सने लादलेल्या करांची व त्याच्या परिणामांची चौकशी करण्यात येईल. सदर कर अयोग्य व्यापारी प्रवृत्तीचा भाग असल्याचे आढळल्यास फ्रान्सविरोधात कर लादला जाऊ शकतो, असे संकेतही लायथायझर यांनी दिले.

फ्रान्सने लादलेल्या करांमुळे अमेरिका व युरोपात सुरू असलेले व्यापारयुद्ध अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. जागतिक व्यापार संघटनेतील एका प्रकरणाच्या मुद्यावरून अमेरिकेने युरोपिय कंपन्यांवर जवळपास १० अब्ज डॉलर्सहून अधिक कर लादले आहेत. त्यापूर्वी युरोपातून आयात होणार्‍या पोलाद व इतर उत्पादनांवरही कर लादण्यात आले असून युरोपिय गाड्यांवरही अशीच कारवाई करण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली होती.

फ्रान्सच्या या कारवाईवर अमेरिका तीव्र नाराजी व्यक्त करीत असली तरी अमेरिकेनेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांची चौकशी सुरू केल्याचे दिसत आहे. जून महिन्यात, अमेरिकी संसदेतील ‘हाऊस ज्युडिशिअरी कमिटी’ने स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांची कसून चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने ‘गुगल’ तर ‘फेडरल ट्रेड कमिशन’कडून ‘फेसबुक’ची चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info