दुबई – आखातात इराणच्या मुद्यावरून तणाव वाढत असतानाच संयुक्त अरब अमिरातीने(युएई) येमेनमधील संघर्षातून माघार घेतली आहे. २०१५ सालापासून सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाखाली येमेनच्या इराणपुरस्कृत हौथी बंडखोरांविरोधात व्यापक लष्करी मोहीम सुरू आहे. चार वर्षानंतरही सौदीच्या नेतृत्त्वाखाली सुरू असणार्या या संघर्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे सौदीबरोबर संघर्षाच्या मुद्यावर झालेल्या मतभेदांमुळे ‘युएई’ने येमेनमधून माघार घेण्यास सुरुवात केल्याचा दावा परदेशी प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे.
येमेनमध्ये हौथी बंडखोरांनी देशातील महत्त्वाच्या बंदरांवर तसेच शहरांवर ताबा मिळविला आहे. या बंडखोरांना इराणच्या राजवटीचे समर्थन असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे. येमेनमधील बंडखोरांच्या माध्यमातून इराण आखातातील सौदीच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे सौदी अरेबियासाठी आखातातील प्रभाव राखण्यासाठी येमेनमधील मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
सौदी अरेबियाने २०१५ साली आखात व आफ्रिकेतील १० हून अधिक मित्रदेशांची आघाडी उभारून हौथी बंडखोराविरोधात आक्रमक लष्करी मोहीम हाती घेतली होती. त्यात जवळपास दोन लाख सैनिकांसह २००हून अधिक लढाऊ विमाने व युद्धनौकांचा समावेश होता. सौदीपाठोपाठ ‘युएई’ची यातील भूमिका व सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमेरिकेनेही यात सौदी अरेबियाला समर्थन देऊन शस्त्रे व अर्थसहाय्य पुरविले होते.
मात्र चार वर्षे सुरू असणार्या या मोहिमेनंतरही सौदीच्या लष्करी मोहिमेला यश मिळालेले नसून उलट हौथी बंडखोरांकडून सौदीवर होणारे हल्ले वाढल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात सौदीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे कतार व मोरोक्कोसारखे देश ‘येमेन संघर्षा’तून बाहेर पडले आहेत. त्यापाठोपाठ आता ‘युएई’ची माघार सौदीसाठी मोठा धक्का मानला जातो. आतापर्यंत आखातातील इंधनापासून इतर सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ‘युएई’ची सौदी राजवटीला भक्कम साथ मिळाली होती. मात्र ‘येमेन’मधील अपयश सौदी व ‘युएई’मध्ये मतभेदांची दरी वाढविणारे ठरले आहे.
‘युएई’च्या लष्कराने येमेनमधील दोन महत्त्वाची बंदरे तसेच ‘एडन’ व ‘पेरिम आयलंड’ या भागातून आपली लष्करी पथके माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या भागांमध्ये ‘युएई’चे सुमारे पाच हजारांहून अधिक सैनिक, रणगाडे तसेच लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती. ‘युएई’ने माघारीस सुरुवात केल्यानंतर या तळांवर सौदीने आपली लष्करी पथके तैनात करण्यास सुरुवात केली आहे. या माघारीच्या मुद्यावर सौदी अरेबियाशी बोलणी झाल्याचा दावा ‘युएई’कडून करण्यात येतो. मात्र या मुद्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे दोन्ही देशांनी टाळले आहे.
‘युएई’च्या निर्णयामागे इराण मुद्यावरून आखातात वाढणारा तणाव आणि येमेनमधील संघर्षाच्या मुद्यावर अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होणारी वाढती टीका ही कारणे असल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे व विश्लेषक करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |