‘ब्रेक्झिट’ करार झाला नाही तर ब्रिटनमध्ये अराजक माजेल – ब्रिटीश पोलीसदलाच्या इशार्‍याला गृहमंत्र्यांचा दुजोरा

‘ब्रेक्झिट’ करार झाला नाही तर ब्रिटनमध्ये अराजक माजेल – ब्रिटीश पोलीसदलाच्या इशार्‍याला गृहमंत्र्यांचा दुजोरा

लंडन – ब्रेक्झिटच्या मुद्यावर कोणताही करार न होता ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला तर ब्रिटनमध्ये अराजक माजेल. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कर तैनात करावे लागेल, असा खळबळजनक इशारा ब्रिटनच्या पोलीसदलाने दिला. ब्रिटीश पोलीसदलाच्या या इशार्‍याला गृहमंत्री साजिद जाविद यांनीही दुजोरा दिला असून अभूतपूर्व स्थिती निर्माण होऊ शकते, असेही बजावले आहे. ब्रेक्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात जोरदार संघर्ष सुरू असून सत्ताधारी पक्षातच दोन तट पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत अराजकासंदर्भातील अहवाल लक्ष वेधून घेणारा ठरतो.

ब्रेक्झिट, संघर्ष, साजिद जाविद, युरोपिय महासंघ, अराजक, ब्रिटन, थेरेसा मेब्रिटन व युरोपिय महासंघात झालेल्या एकमतानुसार, येत्या सहा महिन्यात म्हणजेच मार्च 2019 मध्ये ब्रिटन महासंघातून बाहेर पडणार आहे. मात्र महासंघातून बाहेर पडताना नक्की कोणते अधिकार व तरतुदी असाव्यात यावरून ब्रिटीश सरकार आणि महासंघात जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यामुळे महासंघातून बाहेर पडण्यासाठी ठरलेल्या मुदतीत करार होणार की नाही यावरून अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. ब्रिटीश यंत्रणांनी सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेऊन तयारी सुरू केली असून पोलीसदलाचा अहवाल त्याचाच भाग मानला जातो.

ब्रेक्झिट, संघर्ष, साजिद जाविद, युरोपिय महासंघ, अराजक, ब्रिटन, थेरेसा मेब्रिटीश पोलीसदलाच्या ‘नॅशनल पोलीस को-ऑर्डिनेशन सेंटर’ने, ‘ब्रेक्झिट’ करार न झाल्यास देशात कोणत्या प्रकारची स्थिती असेल, यासंदर्भात अहवाल तयार केला असून त्यात अराजकाचा इशारा दिला आहे. ब्रिटन 29 मार्च, 2019ला बाहेर पडणार असून त्यापूर्वी तीन महिने किंवा त्यानंतर तीन महिने देशात मोठ्या प्रमाणावर हिंसा तसेच लूटालुटीच्या घटना व गुन्हेगारीत वाढ दिसून येईल, असे संकेत अहवालात देण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, औषधे व आरोग्यव्यवस्थेशी संबंधित सामुग्रीची टंचाई व प्रचंड महागाई यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण होईल, असा इशारा ब्रिटीश पोलीसदलाने दिला.

ब्रिटीश प्रसारमाध्यमांमध्ये या अहवालातील काही भाग प्रसिद्ध झाला असून याबाबत गृहमंत्री साजिद जाविद यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी सरकारने सर्व प्रकारच्या शक्यता गृहित धरून तयारी केली असून हेच योग्य पाऊल ठरेल, अशा शब्दात अराजकाबाबतचा इशारा खरा असल्याचे संकेत दिले. त्याचवेळी ब्रेक्झिटमुळे निर्माण होणारी स्थिती अभूतपूर्व असेल, असेही गृहमंत्री साजिद जाविद यांनी बजावले.

ब्रिटीश पोलीसदलाने आपल्या अहवालात ‘ब्रेक्झिट’चा करार न झाल्यास निर्माण झालेल्या अराजकाचा मुकाबला करण्यासाठी लष्कर तैनात करावे लागेल, असा सल्लाही दिला आहे. पोलीसदलाचे प्रमुख चार्ली हॉल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ‘नो डील ब्रेक्झिट’चा उल्लेख करून पोलीस विभाग सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयारी करीत असल्याचे स्पष्ट केले. ब्रेक्झिट कराराच्या मुदतीच्या कालावधीत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यासारखा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे संकेतही सूत्रांनी दिले आहेत.

दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘ब्रेक्झिट’संदर्भात सरकारने तयार केलेला प्रस्ताव व संभाव्य राजकीय स्थितीची माहिती देण्यासाठी रविवारी ब्रिटीश राजघराण्यातील राणी एलिझाबेथ यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

English   हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info