सौदी अरेबिया व युएईचे येमेनवर जोरदार हवाईहल्ले  – प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ले चढविल्याचा हौथी बंडखोरांचा दावा

सौदी अरेबिया व युएईचे येमेनवर जोरदार हवाईहल्ले  – प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ले चढविल्याचा हौथी बंडखोरांचा दावा

सना/रियाध/दुबई – संयुक्त अरब अमिरातीने(युएई) येमेनमधील संघर्षातून माघार घेतल्यानंतरही शनिवारी सौदी व युएई आघाडीने येमेनवर जोरदार हवाईहल्ले चढविल्याचे समोर आले. राजधानी सनावर चढविलेले हे हल्ले येमेनमधील नव्या मोहिमेची सुरुवात असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. तर सौदी-युएईच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून सौदीत ड्रोन हल्ले चढविल्याचा दावा हौथी बंडखोरांनी केला.

सौदी २०१५ साली आखात व आफ्रिकेतील १० हून अधिक मित्रदेशांची आघाडी उभारून हौथी बंडखोराविरोधात आक्रमक लष्करी मोहीम हाती घेतली होती. त्यात जवळपास दोन लाख सैनिकांसह २००हून अधिक लढाऊ विमाने व युद्धनौकांचा समावेश होता. सौदीपाठोपाठ ‘युएई’ची यातील भूमिका व सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमेरिकेनेही यात सौदी अरेबियाला समर्थन देऊन शस्त्रे व अर्थसहाय्य पुरविले होते.

मात्र या लष्करी मोहिमेला अपेक्षित यश मिळत नसल्याचे अहवाल सातत्याने समोर येत होते. हौथी बंडखोरांकडून सौदीत एकामागोमाग झालेल्या हल्ल्यांनी मोहिमेच्या अपयशला दुजोरा दिला होता. या अपयशामुळे मोरोक्को व कतारसारखे देश मोहिमेतून आधीच बाहेर पडले होते. त्यानंतर सौदीचा पारंपारिक सहकारी असणार्‍या युएईनेही काही दिवसांपूर्वी माघारीला सुरुवात केल्याने मोहिमेला जबर धक्का बसल्याचे मानले जात होते.

मात्र आपली माघारी मर्यादित असून येमेनमधील मोहिमेसाठी सौदीला आवश्यक सहकार्य यापुढे कायम राहिल, असा खुलासा युएईकडून करण्यात आला होता. शनिवारी येमेनची राजधानी सनामध्ये झालेल्या हवाईहल्ल्यांनी या खुलाशाला दुजोरा मिळाला आहे. यात युएईच्या नक्की किती विमानांनी सहभाग घेतला याची माहिती देण्यात आली नसली तरी कारवाईतील सहभागाची पुष्टी करण्यात आली आहे. सदर कारवाईत हौथी बंडखोरांचे तळ लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सौदी व युएईची ही कारवाई हौथी बंडखोरांविरोधातील मोहिमेचा नवा टप्पा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या टप्प्यात फक्त बंडखोरांच्या तळांना लक्ष्य करण्यात येणार आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये येमेनमधील शाळा, रुग्णालये तसेच नागरी वस्त्यांवर कारवाई झाली होती. या हल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रचंड टीका झाली होती. सौदीला समर्थन देणार्‍या पाश्‍चात्य देशांनी शस्त्रपुरवठा व इतर सहाय्य रोखण्याचा इशाराही दिला होता.

त्यामुळे सौदीने आपले धोरण बदलण्याचे संकेत देऊन नव्याने हौथी बंडखोरांविरोधात हल्ल्यांना सुरुवात केल्याचे शनिवारच्या कारवाईवरून दिसून येत आहे.

English      हिंदी   ” ]

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info