युरोपमधील ‘स्लिपर सेल’च्या सहाय्याने इराण ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ले घडवील – ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा इशारा

युरोपमधील ‘स्लिपर सेल’च्या सहाय्याने इराण ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ले घडवील – ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा इशारा

लंडन, दि. २२ (वृत्तसंस्था) – ‘‘इराणने ‘ऑईल टँकर’ जप्त केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल ब्रिटनने इराणवर कारवाई केलीच तर युरोपमधील आपल्या दहशतवादी ‘स्लिपर सेल’ च्या सहाय्याने इराण थेट ब्रिटनमध्ये हल्ले घडवून आणील’’, असा इशारा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला. इराणसमर्थक हिजबुल्लाहचे ‘टेरर सेल’ युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, याकडे लक्ष वेधून या अधिकार्‍याने ही चिंता व्यक्त केली. इराणबरोबर वाढत असलेल्या या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान ‘थेरेसा मे’ यांनी तातडीने ब्रिटनच्या विशेष सुरक्षा पथकाची बैठक बोलाविली आहे.

‘स्लिपर सेल’, दहशतवादी हल्ले, रिव्होल्युशनरी गार्ड्स, गुप्तचर यंत्रणा, ww3, लंडन, इराण, पर्शियन आखात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या आखातात हेलिकॉप्टर व गस्तीनौकांच्या सहाय्याने ‘स्टेना इम्पेरो’ हा इंधनवाहू टँकर ताब्यात घेतले होते. यानंतर ‘एमआय५’ व ‘एमआय६’ या ब्रिटनच्या दोन्ही गुप्तचर यंत्रणांनी तीव्र चिंता व्यक्त केली. रशिया, चीनपाठोपाठ ब्रिटनच्या सुरक्षेला सर्वाधिक धोका इराणकडूनच आहे, असे या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. इराणच्या या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे गुप्तचर यंत्रणेशी संबंधित एका अधिकार्‍याने ब्रिटनच्या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

२०१५ साली ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांनी लंडनमधील एका घरावर केलेल्या कारवाईत इराणसंबंधित ‘स्लिपर सेल’ उद्ध्वस्त केले होते. इराणसंलग्न हिजबुल्लाह या गटाशी संबंधित या घरात स्फोटकांचा मोठा साठा सापडला होता. पण इराणसमर्थक हिजबुल्लाहचे टेरर सेल नेटवर्क ब्रिटनमध्येच पसरले नसून युरोपमध्ये व्यापलेले आहे, याची जाणीव सदर अधिकार्‍याने करून दिली. अशा परिस्थितीत, आपल्या ‘ऑईल टँकर’ला सोडविण्यासाठी ब्रिटनने इराणविरोधात पाऊल उचलले तर युरोपमधील आपल्या ‘स्लिपर सेल’च्या सहाय्याने इराण ब्रिटनमध्ये हल्ले घडवील, असा इशारा या अधिकार्‍याने दिला.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यामध्ये ‘आयआरजीसी’चे जवान हेलिकॉप्टरमधून ब्रिटनच्या जहाजावर उतरल्याचे तसेच या जहाजावर इराणचा ध्वज फडकविल्याचे दाखविण्यात आले आहे. इराणच्या या हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सोमवारी ‘कोब्रा’ या विशेष सुरक्षा पथकाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत आपल्या जहाजाच्या सुटकेसाठी केल्या जाणार्‍या योजनांवर चर्चा होईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

दरम्यान, पर्शियन आखातात दिवसाढवळ्या इराणच्या ‘आयआरजीसी’ने ब्रिटनच्या जहाजाचे केलेले अपहरण चिंताजनक घटना आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घेऊन इराणविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info