वॉशिंग्टन – ‘हाँगकाँगची समस्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मानवतावादी दृष्टिकोनातून चटकन सोडवू शकतात. त्यांनी हाँगकाँगच्या निदर्शनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची तयारी दाखवायला हवी’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचविले आहे. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष तसे करणार नाहीत, असे संकेत ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील आपल्या प्रतिक्रियेद्वारे सुचविले आहे. पण जोवर चीन हाँगकाँगबाबत उचित निर्णय?घेत नाहीत, तोवर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी वाटाघाटी पुढे ढकलल्या जातील, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले. त्यामुळे अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धाशी हाँगकाँगचा मुद्दा जोडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनसमोरील अडचणी अधिकच वाढविल्याचे दिसते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनबरोबरील व्यापारयुद्धाचा मुद्दा ‘हाँगकाँगशी’ जोडलासोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांनी हाँगकाँगच्या प्रश्नावर निदर्शकांशी चर्चा करून मानवतावादी दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. हाँगकाँगमधले निदर्शक हिंसक बनले असून ते दहशतवादाच्या मार्गाने पुढे चालल्याचा आरोप चीन करीत आहे. तसेच ही निदर्शने चिरडण्यासाठी बळाचा वापर होऊ शकतो, असे संकेत चीनकडून दिले जात आहेत. यामुळे हाँगकाँगमधील निदर्शक अधिकच खवळले असून ते उघडपणे चीनला आव्हान देत आहेत.
अशा परिस्थितीत या निदर्शकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवून चीनचे राष्ट्राध्यक्ष हाँगकाँगची समस्या सोडवू शकतात, असे सांगून ट्रम्प यांनी चीनच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सदर समस्येवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी थेट चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. मात्र चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आजवर अशाप्रकारे आंदोलकांशी वाटाघाटी करून प्रश्न सोडविलेले नाहीत. म्हणूनच चीनने आजवर आपल्या देशातील आंदोलने बळाचा वापर करून चिरडून टाकली होती. अशा परिस्थितीत हाँगकाँगच्या निदर्शकांशी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चर्चा करण्याची अजिबात शक्यता नाही.
मात्र हा पर्याय नाकारल्यास चीनवर पाश्चिमात्य देशांकडून होणार्या टीकेची धार अधिकच वाढू शकते. याचाच लाभ घेण्याची तयारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. सध्या अमेरिका व चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू असून ते रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चा अपेक्षित आहे. मात्र चीनने हाँगकाँगचे प्रकरण नीट हाताळले नाही, तर ही चर्चा पुढे ढकलली जाऊ शकते, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला बजावले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी समस्या आता राजकीय प्रश्नाशी जोडली गेली असून ही ट्रम्प यांची जबरदस्त खेळी ठरू शकते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |