Breaking News

इस्रायलप्रमाणेच तुर्कीलाही अण्वस्त्रसज्ज होण्याचा हक्क आहे – राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा इशारा

अंकारा – जगातील काही देशांकडे अनेक अण्वस्त्रे आहेत व हेच देश आम्हाला अण्वस्त्रे न बाळगण्याचे सल्ले देत आहेत. यापुढे तुर्की हे खपवून घेणार नाही, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी आता तुर्कीलाही अण्वस्त्रसज्ज होण्याचा हक्क असल्याचा इशारा दिला. यावेळी एर्दोगन यांनी इस्रायलचा उघड उल्लेख करून हा देश त्यांच्याकडील अण्वस्त्रांच्या जोरावर आखातातील इतर देशांना भीती दाखवित असल्याचा आरोपही केला. गेली काही वर्षे आखातातील इराण व सौदी अरेबियाकडून अण्वस्त्रसज्जतेसाठी हालचाली सुरू असून त्यात आता तुर्कीची भर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन, इशारा, रेसेप एर्दोगन, क्षेपणास्त्र, अण्वस्त्रसज्ज, तुर्की, सौदी अरेबियातुर्कीत सत्ताधारी ‘एके पार्टी’च्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीला अण्वस्त्रसज्ज करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. ‘जगातील काही देशांकडे एक-दोन नाही तर अनेक अण्वस्त्रांचा साठा आहे. पण हेच देश तुर्की अण्वस्त्रसज्ज होऊ शकत नाही, असे सांगत राहतात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. तुर्कीनजिक जवळपास शेजारी देशाप्रमाणे असलेल्या इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत. इस्रायल त्याच्या बळावर इतर देशांना भीती दाखवतो आहे. आखातातील इतर कोणताही देश इस्रायलला हात लावू शकत नाही’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीला अण्वस्त्रसज्ज करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

तुर्कीने गेल्या तीन दशकात अण्वस्त्रप्रसारबंदी तसेच क्षेपणास्त्रांचा प्रसार रोखण्यासंदर्भातील विविध आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या करारातील तरतुदी धुडकावून तुर्की अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी प्रयत्न करेल, असे संकेतही एर्दोगन यांनी दिले. तुर्कीचे हे प्रयत्न आखातातील शस्त्रस्पर्धा व तणाव अधिकच वाढविण्याची शक्यता आहे. विशेषतः सध्या अमेरिका व इस्रायलकडून इराणच्या अणुकार्यक्रमाविरोधात आक्रमक मोहीम सुरू असतानाच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वाकांक्षा आखातातील समीकरणे बदलणारी ठरु शकते.

चार वर्षांपूर्वी एका वेबसाईटने तुर्की अण्वस्त्रसज्जतेसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला होता. त्यात जर्मन गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेण्यात आल्याचा उल्लेख होता. मात्र तुर्की तसेच इतर देशांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया दिली नव्हती. आता राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वेबसाईटच्या सदर दाव्यांना पुष्टी मिळाल्याचे दिसत आहे. तुर्कीने रशिया तसेच जपानबरोबर अणुऊर्जेबाबत करारही केले आहेत. त्याचवेळी अंतराळक्षेत्र व क्षेपणास्त्र कार्यक्रमालाही वेग दिला आहे.

ही सर्व पार्श्‍वभूमी तुर्की अण्वस्त्रसज्जतेसाठी हालचाली करत असल्याचे संकेत देणारी आहे. तुर्कीच्या आधी सौदी अरेबियानेही अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले असून त्यासाठी चीन, पाकिस्तानसारख्या देशांचे सहाय्य घेतल्याचे दावे उघड झाले होते. सौदीने आपल्या अण्वस्त्रसज्जतेसाठी इराणकडून अण्वस्त्रे मिळविण्यासाठी राबविण्यात येणार्‍या अणुकार्यक्रमाचे कारण पुढे केले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info