रियाध/दुबई – सौदी अरेबियातील सर्वात मोठे इंधनप्रक्रिया प्रकल्प आणि मुख्य इंधनक्षेत्रावर शनिवारी ड्रोन्सचे हल्ले झाले. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या दोन्ही ड्रोन्स हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. सौदीच्या इंधन प्रकल्पांविरोधात मोठी मोहीम छेडल्याचा इशारा हौथी बंडखोरांशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने दिला. तर या हल्ल्यांमुळे हौथी बंडखोरांकडे प्रगत ड्रोन्स असल्याचे उघड झाले असून सौदीने देखील ड्रोन्सभेदी यंत्रणांनी सज्ज होण्याची आवश्यकता असल्याची चर्चा सौदीच्या माध्यमांमध्ये सुरू आहे.
सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील ‘अबकैक आणि खुरैस या दोन शहरांमध्ये हे हल्ले चढविण्यात आले. यापैकी अबकैक येथे जगातील सर्वात मोठा इंधनप्रक्रिया प्रकल्प आहे. तर खुरैस शहरात इंधनक्षेत्र आहे. पहाटे चारच्या सुमारास या दोन्ही इंधन प्रकल्पांवर मोठे स्फोट झाले. अबकैक प्रकल्पाच्या परिसरात गोळीबार झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यामुळे दोन्ही इंधनप्रकल्पांवर दहशतवादी हल्ले झाल्याचे बोलले जात होते. पण सौदीच्या यंत्रणेने याबाबतचे वृत्त फेटाळले.
सौदी राजवटीशी संलग्न असलेल्या ‘सौदी अराम्को’ कंपनीच्या या दोन्ही ठिकाणांवर ड्रोन हल्ले झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली. या हल्ल्यामुळे मोठा आगडोंब उसळला होता. कित्येक तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले असून जीवितहानी झाली नसल्याचे सौदीच्या यंत्रणांनी जाहीर केले. सौदीच्या दोन्ही प्रकल्पांवरील या हल्ल्यांची जबाबदारी हौथी बंडखोरांनी स्वीकारली. ‘सौदीच्या इंधनप्रकल्पाला हादरा देण्यासाठी मोठी योजना आखली असून शनिवारी दहा ड्रोन्सनी दोन प्रकल्पांवर हल्ले चढविले’, असे हौथी बंडखोरांशी संलग्न ‘अल-मसिराह’ या वृत्तवाहिनीने सांगितले.
याआधीही हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधन पाईपलाईन, इंधन क्षेत्र आणि प्रवासी विमानतळ तसेच येमेनच्या लष्करावर ड्रोन हल्ले चढविले होते. हे सर्व ड्रोन हल्ले कमी तीव्रतेचे होते. पण शनिवारी पहाटे चार वाजता चढविलेले ड्रोन्सचे हल्ले विध्वंसक होते, असा दावा सौदीच्या यंत्रणा करीत आहेत. या हल्ल्यांमुळे हौथी बंडखोरांकडे प्रगत ड्रोन्स सज्ज असल्याचे उघड झाले आहे. सौदीच्या सुरक्षेसाठी व हौथींचे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी पाश्चिमात्य मित्रदेशांकडून ड्रोनभेदी यंत्रणा खरेदी करण्याची मागणी सौदीतून केली जात आहे.
येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणकडून सहाय्य मिळत असल्याचा आरोप सौदी, अरब मित्रदेश आणि अमेरिकेने केला होता. सौदीने याचे पुरावेही आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर उघड केले होते. येमेनमधील हौथी बंडखोरांच्या आडून इराण सौदी व अरब मित्रदेशांविरोधात छुपे युद्ध छेडत असल्याचा आरोप सौदीची माध्यमे करीत आहेत.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या इंधन निर्यातीवर कठोर निर्बंध लादले आहेत. यामुळे संतापलेल्या इराणने पर्शियन आखातातून इंधनाची वाहतूक होऊ देणार नसल्याची धमकी दोन महिन्यांपूर्वी दिली होती. त्यानंतर पर्शियन आखातातील सौदी, युएई तसेच इतर परदेशी ऑईल टँकर्सवर घातपाती हल्ले झाले होते. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. पण इराणच या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा दावा अमेरिका व अरब विश्लेषकांनी केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |