अंकारा/पॅरिस/तेहरान, दि. १० (वृत्तसंस्था) – ‘‘तुर्कीने सुरू केलेल्या सिरियातील लष्करी कारवाईने या देशाचे अखंडत्व कायम राहणार आहे. तरीही युरोपिय देशांनी तुर्कीच्या या लष्करी कारवाईवर ‘सिरियावरील आक्रमण’ असा ठपका ठेवला, तर ३६ लाख सिरियन निर्वासितांसाठी युरोपचे दरवाजे खुले करू’’, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केली. पण तुर्कीच्या या कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जोरदार टीका होत आहे.
सिरियाच्या सीमेत सैन्य घुसवून कुर्द आणि सिरियन बंडखोरांविरोधात तुर्कीने सुरू केलेल्या लष्करी कारवाईत मोठ्या संख्येने सिरियन जनतेचा बळी गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. फ्रान्सने तुर्कीच्या राजदूतांना समन्स बजावले असून तुर्कीने त्वरीत सिरियातील हल्ले बंद करावे, असे बजावले. तर तुर्कीची सिरियातील कारवाई पूर्णपणे अमान्य असून यामुळे दहशतवाद्यांना बळ मिळेल, अशी टीका इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील सिरियातील कुर्दांविरोधात तुर्कीने केलेल्या कारवाईवर चिंता व्यक्त करून ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनेला यातून बळ मिळेल, असा इशारा दिला. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) यांनी तुर्कीचे हल्ले म्हणजे सिरियावरील हल्ले ही या क्षेत्रासाठी धोकादायक घडामोड असल्याची चिंता व्यक्त केली. या हल्ल्यामुळे अरब मित्रदेश सिरियाचे सार्वभौमत्व संकटात सापडले असल्याची टीका ‘युएई’ने केली. अरब लीगने देखील या मुद्यावर शनिवारी तातडीची सभा बोलाविली आहे.
सिरियातील संघर्षबंदीच्या मुद्यावर तुर्कीशी चर्चा करणार्या इराणने देखील सदर लष्करी कारवाई त्वरीत थांबविण्याचे आवाहन केले आहे. तुर्कीने लष्करी कारवाई रोखली नाही तर सिरियात मोठे मानवी संकट ओढावेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. पण तुर्की सिरियातील आपल्या लष्करी कारवाईवर ठाम आहे. याउलट सिरियातील कारवाईवर तुर्कीला उपदेश देणार्या युरोपिय देशांवर सिरियन निर्वासितांचे लोंढे सोडण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दिली. याआधीही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपिय देशांवर सिरियन निर्वासित सोडण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, सिरियातील तैनातीमुळे अमेरिकेच्या सैनिकांच्या सुरक्षेला धोका होता. म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियातून अमेरिकी सैनिकांची माघार घेतली. पण ही माघार घेताना अमेरिकेने तुर्कीला सिरियात सैन्य घुसवून हल्ले चढविण्याची परवानगी दिलेली नाही, याची आठवण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी करून दिली आहे. त्यामुळे तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात सुरू केलेल्या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा नसल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |