व्हेनेझुएलातील मदुरो यांची सत्ता उलथण्यासाठी ‘प्रायव्हेट आर्मी’ तैनात करा – ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स यांचा प्रस्ताव

व्हेनेझुएलातील मदुरो यांची सत्ता उलथण्यासाठी ‘प्रायव्हेट आर्मी’ तैनात करा – ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स यांचा प्रस्ताव

वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी कंत्राटी सैनिकांची तैनाती करा, असा प्रस्ताव ‘ब्लॅकवॉटर’ या प्रसिद्ध कंपनीचे प्रमुख ‘एरिक प्रिन्स’ यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असणार्‍या एरिक प्रिन्स यांनी गेल्याकाही महिन्यांपासून याबाबतची योजना तयार करण्यावर भर दिला असून त्यासाठी व्हेनेझुएलातून बाहेर पडलेल्या निर्वासितांची मदत घेण्याचेही संकेत दिले आहेत. प्रिन्स यांच्या योजनेनुसार, मदुरो यांची राजवट उलथण्यासाठी सुमारे पाच हजार कंत्राटी सैनिक तैनात करावे लागणार आहेत.

व्हेनेझुएलात गेल्या काही महिन्यांपासून अराजकसदृश परिस्थिती असून लाखो नागरिकांनी देश सोडून शेजारी देशांचा आश्रय घेतला आहे. देशात अन्न, पाणी, वीज, औषधे यांची भीषण टंचाई असून त्यामुळे अनेक नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. मात्र सध्या सत्तेची सूत्रे हाती असणार्‍या मदुरो यांनी या सर्वांसाठी अमेरिका व इतर देशांना जबाबदार धरले आहे.

मदुरो यांच्याविरोधात जुआन गैदो यांनी आक्रमक आंदोलन सुरू केले असून त्याला जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेसह अनेक देशांनी गैदो यांना मान्यता दिली असून मदुरो यांना सत्ता सोडण्याचे आवाहन केले आहे. मात्र मदुरो यांनी रशिया, चीन व क्युबाच्या सहाय्याने आपली सत्ता टिकवली असून अमेरिकेसह इतर देशांचे प्रयत्न उधळून लावण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या मुद्यावर सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा दिला असून त्यात लष्करी मोहिमेचाही समावेश आहे. व्हेनेझुएलाच्या शेजारी देशांमध्ये त्यासाठी अमेरिकेने जमवाजमव केल्याचेही समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रिन्स यांनी दिलेला प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

प्रिन्स यांनी गेल्याच महिन्यात, अफगाणिस्तानात अमेरिकी सैनिकांच्या जागी हजारो कंत्राटी सैनिकांना तैनात करून अमेरिकेला आपली या संकटातून सुटका करता येईल, असा प्रस्ताव मांडून खळबळ उडवली होती. अफगाणिस्तानात सध्या तैनात असलेल्या नाटोच्या सुमारे ५० हजार सैनिकांना माघारी घेतल्यानंतर त्यांच्या जागी सहा हजार कंत्राटी लष्कर आणि अमेरिकेच्या ‘स्पेशल फोर्सेस’चे दोन हजार जवान तैनात करावे, अशी योजना प्रिन्स यांनी मांडली होती. हा निर्णय घेतला तर दरवर्षी अफगाण युद्धावर होणार्‍या खर्चात ३० अब्ज डॉलर्सची कपात होईल, असा दावाही ब्लॅकवॉटरच्या प्रमुखांनी केला होता.

मदुरो यांच्याविरोधात लष्कराने उठाव करावा – जुआन गैदो यांचे आवाहन

कॅराकस – व्हेनेझुएलाचे नेते जुआन गैदो यांनी देशातील लष्कराला हुकुमशहा निकोलस मदुरो यांच्याविरोधात उठाव करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये गैदो यांनी आता निर्णायक टप्पा सुरू झाला असल्याचा इशाराही दिला आहे.

 

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info