रशियन लष्कराकडून बाखमतमधील हल्ल्यांमध्ये ‘थर्मोबॅरिक रॉकेटस्‌‍’चा वापर

- युक्रेनचे क्षेपणास्त्र बेलारुसमध्ये कोसळल्याचा दावा

रशियन लष्कराकडून बाखमतमधील हल्ल्यांमध्ये ‘थर्मोबॅरिक रॉकेटस्‌‍’चा वापर

मॉस्को/किव्ह, दि. 30 (वृत्तसंस्था) – डोन्बास क्षेत्रातील आघाडीचे शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बाखमतसाठी निर्णायक लढाई सुरू झाल्याचे समोर येत आहे. रशियाने बाखमतवरील ताब्यासाठी अधिकाधिक शस्त्रे व यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली असून ‘टॉस-1ए थर्मोबॅरिक रॉकेटस्‌‍’चा वापर केल्याचे वृत्त आहे. बाखमतबरोबरच डोन्बासच्या आघाडीवर पाच शहरांवर रशियन फौजांकडून प्रखर हल्ले सुरू असल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी केली. डोन्बासमध्ये लढाई सुरू असतानाच शुक्रवारी राजधानी किव्हवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ले झाल्याचे सांगण्यात येते. तर युक्रेनचे क्षेपणास्त्र बेलारुसच्या हद्दीत कोसळल्याचेही उघड झाले असून बेलारुसने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

थर्मोबॅरिक Thermobaric

रशियन फौजांनी सध्या आपले सर्व लक्ष डोन्बास क्षेत्राच्या ताब्याकडे केंद्रित केले आहे. या क्षेत्रातील संपूर्ण आघाडीवर रशियन लष्कराकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. डोन्बासमध्ये रशियाने अतिरिक्त लष्करी तुकड्या तसेच शस्त्रास्त्रेही तैनात केली असून नव्या व प्रगत यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. डोन्बासमधील बाखमत हे शहर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असून डोनेत्स्क प्रांतावरील ताब्यासाठी यावरील नियंत्रण आवश्यक ठरते. त्यामुळे रशियाकडून गेले महिनाभर बाखमत व भोवतालच्या परिसरात तीव्र हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यासाठी ‘टॉस-1ए थर्मोबॅरिक रॉकेटस्‌‍’चा या प्रगत रॉकेट यंत्रणेचा वापर करण्यात येत असून त्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत.

रशियाच्या बाखमतवरील हल्ल्यांनी हे शहर रक्तरंजित झाल्याची टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केली. गेल्या वर्षी या शहरात 70 हजारांहून अधिक नागरिक वास्तव्य करीत होते, मात्र आता केवळ काहीशे नागरिक शहरात आहेत, याकडेही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. रशियन फौजांनी बाखमत शहराच्या क्षेत्रात प्रवेश करण्यात यश मिळविले असले तरी पूर्ण ताबा मिळविता आलेला नाही. शहराच्या अनेक भागांमध्ये ‘अर्बन वॉरफेअर’ सुरू असल्याची माहिती स्थानिक यंत्रणा व सूत्रांनी दिली.

हे शहर म्हणजे डोन्बासमधील युक्रेनी फौजेचा किल्ला असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी या शहराला भेटही दिली होती. हे शहर रशियाच्या ताब्यात गेल्यास पुढील काही दिवसांमध्ये रशिया डोन्बासवर पूर्ण नियंत्रण मिळवेल, असेही सांगण्यात येते. तर गेले काही आठवडे सुरू असलेल्या प्रखर लढाईत दोन्ही बाजूंचे हजारो जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

बाखमतबरोबरच डोन्बासच्या आघाडीवरील इतर शहरांवरही रशियाकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. गुरुवारी तसेच शुक्रवारी रशियाने वुहलेदर, कुराखिव्हस्का, कॉन्स्टॅटिनिव्हका, मरिन्का व ॲव्हडिव्हका भागात तोफा, रणगाडे व रॉकेट्सच्या सहाय्याने मारा केला. रशियाने खार्किव्ह व सुमी भागातही हल्ले चढविल्याची माहिती युक्रेनने दिली. राजधानी किव्हमध्ये शुक्रवारी पुन्हा ड्रोनहल्ले झाल्याचेही सांगण्यात येते.

दरम्यान, युक्रेनच्या ‘एस-300’ हवाईसुरक्षा यंत्रणेचा भाग असलेले एक क्षेपणास्त्र बेलारुसमध्ये कोसळल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी युक्रेनच्या सीमेतून आलेले क्षेपणास्त्र बेलारुसच्या ब्रेस्ट प्रांतात कोसळले. बेलारुसच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनचे क्षेपणास्त्र बेलारुसच्या हवाईयंत्रणांनी भेदल्याचा दावा केला. याप्रकरणी बेलारुसने चौकशी सुरू केली असून युक्रेनच्या राजदूतांना समन्सही धाडण्यात आले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी हवाईसुरक्षा यंत्रणांकडून रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात असताना सदर घटना घडल्याचे म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info