‘ब्रेक्झिट डील’ झाल्याचा युरोपिय महासंघ व ब्रिटनचा दावा

‘ब्रेक्झिट डील’ झाल्याचा युरोपिय महासंघ व ब्रिटनचा दावा

लंडन – ‘जिथे इच्छा (विल) असते तिथे ‘डील’ असतेच; आमच्यातही एक करार झाला आहे’, अशा शब्दात युरोपिय महासंघाचे प्रमुख जीन क्लॉड जंकर यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर करार झाल्याचे जाहीर केले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ‘ट्विट’ करून ‘ब्रेक्झिट’साठी करार झाल्याची माहिती दिली आहे. या करारावर ब्रिटनसह युरोपिय महासंघातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्रिटनमधील विरोधी पक्ष तसेच आयर्लंडमधील राजकीय पक्षांनी करारावर टीका केली आहे. तर महासंघाचे प्रमुख सदस्य असणार्‍या जर्मनी व फ्रान्सने सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे.

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावरून ब्रिटनमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षाचे नेते म्हणून बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर, ३१ ऑक्टोबर अथवा त्यापूर्वी ब्रिटन महासंघातून बाहेर पडेल, अशी घोषणा केली होती. मात्र त्यासाठी ‘नो डील ब्रेक्झिट’च्याच पर्यायाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय त्यांच्या विरोधकांना आवडलेला नाही. यात त्यांच्या पक्षातील विरोधकांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या भाषणानंतरही ब्रिटनमध्ये गोंधळाची स्थिती कायम असल्याचे समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर ब्रुसेल्सला विशेष बैठकीसाठी गेलेल्या पंतप्रधान जॉन्सन व महासंघाच्या प्रमुखांनी थेट करार झाल्याचे जाहीर करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. महासंघाचे प्रमुख जंकर यांनी करारासंदर्भातील काही कागदपत्रे सोशल मीडियावरही प्रसिद्ध केली असून त्यात करार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करार झाल्याची माहिती देताना, आता देशाचे नियंत्रण पुन्हा आपल्याकडे घेण्याची वेळ आली असून इतर मुद्यांना प्राधान्य देण्यासाठी काम सुरू करता येईल, असे म्हटले आहे.

गुरुवारी झालेल्या कराराला युरोपिय तसेच ब्रिटनच्या संसदेकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. महासंघाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ब्रिटनच्या संसदेत करार नाकारला गेला तर नवे राजनैतिक संकट उभे राहील, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत. असे झाल्यास पंतप्रधान जॉन्सन ‘नो डील’च्या पर्यायावर ठाम राहून बाहेर पडतील, असा दावा त्यांच्या निकटवर्तियांनी केला आहे.

ब्रिटनच्या सरकारचा भाग असलेल्या ‘नॉर्दर्न आयर्लंड’मधील ‘डीयुपी’ या पक्षाने आपल्याला करार मान्य नसून तो ‘नॉर्दर्न आयर्लंड’चे आर्थिक हितसंबंध राखणारा नसल्याने त्याला समर्थन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info