बीजिंग – दुसर्या महायुद्धातील पॅसिफिक क्षेत्रातील संघर्षाचा भाग असणार्या ‘तुलागी आयलंड’ या बेटावर चीनने ताबा मिळविला आहे. पॅसिफिक क्षेत्रातील ‘सॉलोमन आयलंड’ या देशाचा भाग असणार्या बेटाचा करार गेल्या महिन्यात पार पडल्याची माहिती युरोपियन वृत्तसंस्थेने दिली. त्यानुसार ‘सॉलोमन आयलंड’ने ‘तुलागी आयलंड’ हे बेट चीनच्या ‘चायना सॅम’ नावाच्या कंपनीला दिले असून करारात सदर बेटाबरोबरच जवळच्या इतर बेटांच्या वापराचीही परवानगी देण्यात आली आहे. काही दशके तैवानबरोबर राजनैतिक संबंध ठेवणार्या ‘सॉलोमन आयलंड’ने गेल्याच महिन्यात संबंध तोडून चीनशी जवळीक साधली होती.
गेल्या काही वर्षात चीन ‘इंडो-पॅसिफिक’सह संपूर्ण पॅसिफिक महासागरात आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे. त्यासाठी चीनने आपल्या आर्थिक बळाचा वापर सुरू केला होता. पॅसिफिक क्षेत्रातील आठ ‘आयलंड नेशन्स’ना जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य व कर्ज दिल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या ऑस्ट्रेलियातील राजदूतांनी, चीन पॅसिफिक क्षेत्रातील देशांना असुरक्षित कर्जाच्या विळख्यात अडकविण्याचे धोरण राबवित आहे, असा इशाराही दिला होता.
चीनच्या या हालचालींविरोधात अमेरिकेने आघाडी उघडली असून जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारताच्या सहाय्याने चीनची घोडदौड रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेने पॅसिफिक क्षेत्रातील देशांना सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्या असून जवळपास एक अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याचे संकेत दिले होते. न्यूझीलंडनेही गेल्या वर्षी ‘पॅसिफिक रिसेट’ धोरण जाहीर करून या क्षेत्रातील देशांसाठी सुमारे ५० कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त अर्थसहाय्याची तरतूद जाहीर केली आहे. चार महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘सॉलोमन आयलंड’ला भेट देऊन २५ कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्यही जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर, ‘सॉलोमन आयलंड’ने तैवानबरोबर तोडलेले संबंध आणि त्यापाठोपाठ चीनला बेट आंदण देण्याबाबत केलेला करार धक्कादायक ठरतो. ‘सॉलोमन आयलंड’ हा ऑस्ट्रेलियापासून जवळ असणारा देश असून त्यातील बेटावर चीनचा ताबा ऑस्ट्रेलियाच्या चिंता अधिकच वाढविणारा ठरतो. ‘तुलागी आयलंड’ हे बेट एकेकाळी जपानचा नौदल तळ म्हणून ओळखण्यात येत होते. चीनने हे बेट तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी म्हणून घेतले असले तरी त्याचा लष्करी तळ म्हणूनही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लष्करी तळासाठी आवश्यक असणारे ‘डीप पोर्ट’ प्रकारातील क्षेत्र या बेटावर उपलब्ध असल्याने ही शक्यता अधिकच बळावली आहे.
गेल्याच महिन्यात चीनने ‘साऊथ चायना सी’मध्ये कंबोडियातील एका बंदरावर ताबा मिळविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बंदराचा ताबा चीन नौदल तळ म्हणून करणार असल्याची माहितीही प्रसिद्ध झाली होती. चीन व कंबोडियाच्या युद्धनौकांचे एकत्रित फोटोही प्रसिद्ध झाले होते. त्यापाठोपाठ ‘सॉलोमन आयलंड’च्या बेटावरील ताबा चीनच्या संरक्षणविषयक महत्त्वाकांक्षेला दुजोरा देणारा ठरतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |