इराक व लेबेनॉनमधील अस्थैर्यामागे अमेरिका, इस्रायल आणि अरब देश – इराणच्या नेत्यांचा आरोप

इराक व लेबेनॉनमधील अस्थैर्यामागे अमेरिका, इस्रायल आणि अरब देश – इराणच्या नेत्यांचा आरोप

बगदाद/तेहरान – गेल्या काही आठवड्यांपासून इराक आणि लेबेनॉनमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. याद्वारे इराक व लेबेनॉनमध्ये अस्थैर्य माजविण्याचा कट अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया व त्यांच्या अरब मित्रदेशांनी आखल्याचा आरोप इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी केला. अशी निदर्शने कशी चिरडून टाकायची, हे इराणला बरोबर ठाऊक आहे, असे सांगून खामेनी यांनी इराक व लेबेनॉनच्या सरकारला आक्रमक कारवाईचा सल्ला दिला.

इराणचे सर्वाधिकार असलेल्या खामेनी यांनी इराक आणि लेबेनॉनमधील घडामोडींची गंभीर दखल घेतली. इराक व लेबेनॉनमधील इराणशी मैत्रीपूर्ण सहकार्य असलेले सरकार पाडण्यासाठी ही निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत, असा दावा खामेनी यांनी केला. अमेरिका, इस्रायल आणि पाश्‍चिमात्य देशांनी या कट रचला तर इराणशी वैर असणार्‍या क्षेत्रीय देशांनी त्यांना सहाय्य पुरविले, असा आरोप करून खामेनी यांनी सौदी व अरब देशांवर निशाणा साधला.

‘निदर्शकांना अधिकारच हवे असतील तर त्यांनी त्यासाठी सनदशीर मार्ग स्वीकारावा. अन्यथा, या देशाच्या यंत्रणांनी कठोर पर्यायांचा वापर केला तर संबंधित देशांमध्ये अराजक निर्माण होईल’, असा इशारा खामेनी यांनी दिला. इराक व लेबेनॉनमधील सरकारला इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कारवाईचे अनुकरण करण्याचा सल्ला खामेनी यांनी दिला. ‘इराणमध्येदेखील अशी राजवटविरोधी निदर्शने होत असतात. पण अशी निदर्शने कशी चिरडायची हे इराणला बरोबर ठाऊक आहे’, असे खामेनी म्हणाले.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, ‘कुद्स फोर्स’ या इराणच्या लष्करातील सर्वात प्रभावी गटाचे प्रमुख असलेल्या जनरल कासेम सुलेमानी यांनी इराकचा दौरा करून सरकारच्या काही प्रतिनिधींशी चर्चा केली. आयातुल्ला खामेनी यांच्याप्रमाणे जनरल सुलेमानी यांनीही, लष्करी सामर्थ्याच्या जोरावर इराक सरकारने ही निदर्शने चिरडून टाकावी, असा सल्ला दिला.

दरम्यान, दोन आठवड्यांपासून लेबेनॉनमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान हरिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण हरिरी यांच्याप्रमाणे हिजबुल्लाह, अमल व इतर इराणसंलग्न पक्षांच्या नेत्यांनीही राजीनामे द्यावे, अशी मागणी केली जात आहे. तर इराकमधील निदर्शक पंतप्रधान महदी यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देत आहेत.

इराक व लेबेनॉनमधील हे अस्थैर्य इराणसमोरील मोठे आव्हान असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, खामेनी व सुलेमानी यांनी निदर्शकांवर कठोर कारवाईची सूचना केल्याचे दिसत आहे.

 

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info