बुडापेस्ट – ‘युरो हे समान चलन म्हणजे सापळा असल्याचे युरोपिय देशांनी आता मान्य करायला हवे. हे चलन म्हणजे काही सोन्याची खाण ठरलेले नाही. युरोझोन व त्याबाहेरील युरोपिय देशांनी युरो ही एक धोरणात्मक चूक होती याची कबुली देणे भाग आहे. त्याचवेळी युरोपिय देशांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध हवा’, असा खळबळजनक इशारा हंगेरीच्या ‘सेंट्रल बँके’चे प्रमुख ग्यॉर्गी मॅतोल्सी यांनी दिला.
सध्या युरोपिय देशांमध्ये ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर प्रचंड अस्वस्थता असून अमेरिका-चीन व्यापारयुद्ध व इतर मुद्यांमुळे अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढू लागला आहे. युरोपमधील आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळख असणार्या जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन यासारख्या देशांमध्ये मंदीसदृश स्थिती असून महासंघाचा विकासदर घटण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वीच दिला आहे. त्याचवेळी अनेक सदस्य देशांमधील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ‘युरो’विरोधात असणारी नाराजी कायम असल्याचेही समोर येत आहे.
हंगेरी हा महासंघातील महत्त्वाचा सदस्य देश असला तरी निर्वासितांसह इतर अनेक मुद्यांवरून महासंघाशी वारंवार खटके उडत आहेत. ‘युरो’ हा त्यापैकी एक आघाडीचा मुद्दा असून महासंघाचा अंतर्गत अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपही नाराजीचे प्रमुख कारण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर हंगेरीच्या ‘सेंट्रल बँके’च्या प्रमुखांनी युरोविरोधात घेतलेली उघड भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
‘१९९९ सालापूर्वी युरोपिय महासंघातील सदस्य देशांना यशासाठी तसेच प्रगतीसाठी युरोसारख्या समान चलनाची आवश्यकता भासली नव्हती. युरोझोनचा भाग बनलेल्या इतर सदस्य देशांनाही त्यानंतर युरोचा काहीच फायदा झाल्याचे दिसून आलेले नाही. आता या हानिकारक व निरर्थक ठरलेल्या स्वप्नातून जागे होण्याची वेळ आली आहे’, अशा शब्दात हंगेरीच्या ‘सेंट्रल बँके’चे प्रमुख ग्यॉर्गी मॅतोल्सी यांनी ‘युरो’वर टीकास्त्र सोडले.
अमेरिकेत २००८ साली आलेल्या मंदीनंतर युरोपलाही मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले होते. युरोपातील अनेक देशांनी क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या. त्यातून युरोपिय देशांना बाहेर काढण्यासाठी अनेक देशांना महासंघाकडून ‘बेलआऊट’ देण्यात आला होता. या अर्थसहाय्याच्या मोबदल्यात महासंघाने संबंधित देशांवर मोठ्या प्रमाणात अन्यायकारक अटीही लादल्या होत्या. या अटींमुळे ‘बेलआऊट’ धोरणाविरोधात युरोपिय जनतेत तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली होती.
यातूनच ‘युरो’ चलनाविरोधात असलेली नाराजीही समोर आली असून गेल्या काही वर्षात युरोपातील बहुतांश देशातून या चलनाला होणारा विरोध वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |