तेहरान/वॉशिंग्टन – अणुकरार मोडीत काढून इराणने आपला फोर्दो अणुप्रकल्प कार्यान्वित केला. तसेच युरेनियमचे संवर्धन पाच टक्क्यांवर नेणार असल्याची घोषणा करून इराणने सर्वांच्या चिंता वाढविल्या आहेत. फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन सुरू करून इराणने चुकीच्या दिशेने पावले उचलल्याचा सज्जड इशारा अमेरिकेने दिला आहे. आजवर इराणची बाजू उचलून धरणार्या फ्रान्सने देखील इराणच्या या निर्णयावर गंभीर चिंता व्यक्त केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबर महिन्यात इराणवर नवे कठोर निर्बंध लादले होते. त्यानंतर इराणने २०१५ सालच्या अणुकरारात सहभागी असलेल्या युरोपिय देशांना हे निर्बंध मागे घेण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. याृ कालावधीत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर इराण अणुकरारातून बाहेर पडेल, असा इशारा या देशाने दिला होता.
ही मुदत संपली असून आपल्याला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे अणुकराराच्या शर्तीचे उल्लंघन करण्याची घोषणा इराणने केली. बुधवारी इराणच्या अणुऊर्जा आयोगाने छुपा फोर्दो अणुप्रकल्प वेगाने कार्यान्वित करण्याचे जाहीर केले. अणुकरारानुसार इराण फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियम संवर्धन ३.६७ टक्क्यांपलीकडे नेणार नव्हता. पण आता मात्र या कराराशी इराणने फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियम संवर्धन थेट पाच टक्क्यांवर नेले आहे.
याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले असून इराणने चुकीच्या दिशेने पावले उचलल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. अणुकरारासंदर्भात इराणची बाजू घेणार्या फ्रान्सनेही यावर चिंता व्यक्त केली. चीनच्या दौर्यावर असलेल्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ही अत्यंत संवेदनशील घटना असल्याचे म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांबरोबर अणुकरार झाल्यानंतरही इराणने त्याचे कधीच पालन केले नव्हते. आत्ता तर इराण उघडपणे अणुकरार मोडून टाकत आहे. त्याचा इस्रायलच्या सुरक्षेवर भयंकर परिणाम होणार असून कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, असे इस्रायलने बजावले आहे. सौदी अरेबिया देखील अशाच स्वरुपाचे इशारे देत आहे. यामुळे इराणने फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमच्या संवर्धनाचे प्रमाण वाढविल्याचे जाहीर करून या क्षेत्रातील तापमान वाढविले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |