वॉशिंग्टन/बीजिंग, दि. १४ (वृत्तसंस्था) – अमेरिका व चीनने परस्परांच्या उत्पादनांवर लादलेल्या करांना स्थगिती देणार्या प्राथमिक टप्प्यातील व्यापारी कराराला दोन्ही देशांनी मान्यता दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्विटरवरून याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या ‘ट्विट’नंतर चीननेही पत्रकार परिषदेत प्राथमिक टप्प्यातील करार झाल्याला दुजोरा दिला असून जानेवारी महिन्यात त्यावर स्वाक्षर्या होणार आहेत. हा करार अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या अंताची सुरुवात असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
अमेरिका व चीनमध्ये गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ व्यापारयुद्ध सुरू आहे. या व्यापारयुद्धाचा जबरदस्त फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला असून जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे व्यापारयुद्ध रोखण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. यापूर्वी दोनदा व्यापारी कराराच्या हालचालींना धक्का बसल्यानंतरही चीनकडून व्यापारयुद्ध रोखणार्या करारासाठी पुढाकार घेण्यात येत होता. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी असा करार कदाचित २०२० सालानंतरच होईल, अशा स्वरुपाचे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा व्यापारयुद्ध लांबण्याचे संकेत मिळाले होते.
मात्र बुधवारी ट्रम्प यांनी लवकरच चीनबरोबर मोठा व्यापारी करार दृष्टिपथात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा करार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शुक्रवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करून प्राथमिक टप्प्यातील ‘फेज १’ कराराला मान्यता मिळाल्याचे जाहीर केले. या करारानुसार, चीन पुढील दोन वर्षात अमेरिकेच्या कृषी, उत्पादन, ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातून २०० अब्ज डॉलर्सहून अधिक आयात करणार आहे. त्यात कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असण्याचे संकेत असून पुढील दोन वर्षात ही आयात ३२ अब्ज डॉलर्सने वाढविण्यास चीनने मान्यता दिली आहे.
अमेरिकी कंपन्यांवर चीनला तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याबाबत असलेला नियम शिथिल करण्यात आला आहे. त्याचवेळी चीनने चलनाचे अवमूल्यन करण्यास स्थगिती दिली असल्याचा दावाही अमेरिकी अधिकार्यांनी केला. अमेरिकेच्या उत्पादनांवर चीनने लादलेले करही कमी तसेच रद्द करण्यात येतील, अशी माहिती चीनकडून देण्यात आली आहे. त्याबदल्यात अमेरिकेकडून चीनच्या १६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील संभाव्य कर रद्द करण्यात आले आहेत. मात्र २५० अब्ज डॉलर्सच्या चिनी निर्यातीवर असलेले २५ टक्के कर कायम ठेवण्यात आले आहेत.
अमेरिका व चीनमधील व्यापारी करार प्राथमिक टप्प्यातील असून चीनने त्याचे उल्लंघन केल्यास करार रद्द होऊन पुन्हा कर लादले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्याचवेळी प्राथमिक टप्प्यातील या करारानंतर ताबडतोब ‘फेज २’ कराराच्या चर्चेस सुरुवात करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेतील दोन आघाडीच्या देशांमधील व्यापारी संघर्ष संपविण्याचे संकेत देणार्या या करारावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिका, युरोप व आशियातील शेअरबाजारांनी विक्रमी उसळण घेतली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |