हॉंगकॉंग – सोन्याच्या दरांमध्ये पुढच्या वर्षी २० टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत विश्लेषक व अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत. यावर्षी अर्थात २०१९ सालात सोन्याच्या दरांमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली असून या दशकात सोन्याच्या दरांमध्ये नोंदविण्यात आलेली ही सर्वोत्तम वाढ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय तणाव आणि जगातील मध्यवर्ती बँकाकडून सातत्याने घटविण्यात आलेले व्याजदर हे सोन्याच्या दरांमधील वाढीसाठी प्रमुख घटक ठरल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले.
गेल्या वर्षभरापासून अमेरिका व चीन या जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. हे व्यापारयुद्ध संपविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये प्राथमिक करार झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता अद्यापही कायम आहे. त्याचवेळी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचे निश्चित झाले असले तरी त्याबाबतची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. आखाती देशांमध्येही तीव्र संघर्ष सुरू असून हॉंगकॉंगमधील आंदोलनही अस्थैर्यात भर टाकणारे ठरले आहे.
या अस्थैर्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उमटत असून मध्यवर्ती बँकांनी सावधगिरीची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी व्याजदरांमध्ये सातत्याने घट करण्यात येत असून सोन्याच्या खरेदीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत असून दरांमधील वाढीमागे हा एक प्रमुख घटक ठरल्याचा दावा विश्लेषकांनी केला. ‘एएक्सआय ट्रेडर’ कंपनीतील विश्लेषक स्टिफन इनेस यांनी २०२० साली सोन्याचे दर १,७७४ डॉलर्स प्रति औंस पर्यंत जातील, असा दावा केला.
यापूर्वी २०११ साली सोन्याचे दर १,८९५ डॉलर्स प्रति औंसपर्यंत गेले होते व ही सर्वोच्च पातळी मानली जाते. पुढील वर्षी ही पातळी गाठण्याचे संकेत नसले तरी एकूण दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली जाईल, असे इनेस यांनी सांगितले. हॉंगकॉंगमधील एक विश्लेषक जोशुआ रॉटबर्ट यांनी, पुढील वर्षी अर्थात २०२० साली सोन्याचे दर १६०० डॉलर्स प्रति औंसाच्या वर राहण्याचे संकेत दिले असून १० टक्के वाढीची शक्यता वर्तविली आहे.
सध्या सोन्याचे दर प्रति औंस १,४८० डॉलर्स प्रति औंस असे असून २०१८ सालच्या अखेरीस ते १,२८३ डॉलर्स प्रति औंस इतके होते. वर्षभरात सोन्याच्या दरांमधील वाढीचा विचार केल्यास ही वाढ १५ टक्क्यांहून अधिक आहे, याची जाणीव विश्लेषकांनी करून दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |