अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य केल्यास इराणच्या ५२ ठिकाणांवर अमेरिका घणाघाती हल्ले चढविल – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन/बगदाद/तेहरान – ‘कासेम सुलेमानी यांचा सूड घेण्यासाठी इराणने अमेरिकेवर हल्ले चढवलेच, तर याबाबतचे अमेरिकेचे धोरण अगदी सुस्पष्ट असेल. अमेरिकेने इराणमध्ये ५२ टार्गेट निश्‍चित करून ठेवलेले आहेत. यावर अमेरिका घणाघाती हल्ले चढविल आणि यात इराणसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार्‍या स्थानांचाही समावेश आहे. अमेरिकेने आधुनिक शस्त्रास्त्रांवर सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्स इतका खर्च केलेला आहे. ही शस्त्रास्त्रे इराणच्या विरोधात वापरताना आम्ही कचरणार नाही’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावले आहे. इराणने आपल्या जामकारन मशिदीवर लाल ध्वज फडकावला आहे. इराणच्या परंपरेनुसार हा ध्वज फडकावणे ही निर्णायक युद्धाची घोषणाच मानली जाते. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला हे इशारे दिले आहेत.

कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेतल्यावाचून इराण स्वस्थ बसणार नाही. लवकरच अमेरिकेने केलेल्या चुकीची जाणीव या देशाला करून दिली जाईल, असे इराणचे सर्वोच्च नेते सांगत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, शनिवारच्या रात्री इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासाजवळ तसेच अमेरिकेच्या हवाई तळावर रॉकेटस्चे हल्ले झाले. ही कात्युशा रॉकेटस् स्थानिक पातळीवरच तयार केली जातात व इराणसमर्थक गटांकडून याचा वापर केला जातो. हा हल्ला या गटांनी केला असावा, असे दावे केले जात आहेत. या हल्ल्यात अमेरिकेची विशेष हानी झालेली नाही. पण त्याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. सदर हल्ल्यानंतर अमेरिकेची हेलिकॉप्टर्स बराच काळ आपल्या दूतावास व हवाई तळाचे रक्षण करण्यासाठी घिरट्या घालत होती. यामुळे इथली परिस्थिती अधिकच ज्वालाग्रही बनल्याचे दिसत आहे.

मेजर जनरल कासेम सुलेमानी यांचे शव इराणमध्ये आणल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इराणमध्ये लाखोजण रस्त्यावर उतरले असून अमेरिकेचा तीव्र निषेध करणार्‍या घोषणा दिल्या जात आहेत. इराणच्या कोम शहरातील धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या जामकरन येथील प्रार्थनास्थळावर लाल ध्वज फडकावण्यात आला आहे. तसे करणे म्हणजे निर्णायक युद्धाची घोषणा मानली जाते. इराणमधील इतर प्रार्थनास्थळांवरही असे ध्वज लावण्यात आले आहेत. याद्वारे इराण अमेरिकेबरोबर युद्धाला तयार झाल्याचा इशारा आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीने दिला असून इराणच्या जनतेने युद्धासाठी सज्ज रहावे, असा संदेश दिला आहे. याबरोबर अमेरिका व इस्रायलचे राष्ट्रध्वज संतप्त इराणींकडून पेटविण्यात येत आहेत.

इराण युद्धाची तयारी करीत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात समज दिली आहे. ‘इराणने अमेरिकेवर हल्ला चढविण्याची चूक करता कामा नये, असा सल्ला मी त्यांना देईन’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. इराणने अमेरिकेचे हितसंबंध, अमेरिकन नागरिकांवर हल्ले चढविलेच, तर अमेरिका इराणच्या ५२ ठिकाणांवर घणाघाती हल्ले चढविल. ही ५२ ठिकाणे अमेरिकेने याआधीच निवडून ठेवलेली आहेत. १९७९ साली इराणमधील अमेरिकेच्या दूतावासाचा ताबा घेऊन कट्टरपंथियांनी अमेरिकेच्या ५२ राजनैतिक अधिकार्‍यांना व नागरिकांना ४४४ दिवस ओलीस धरले होते. याची आठवण करून देऊन इराणमधील ५२ ठिकाणे निवडण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेने आधुनिक शस्त्रास्त्रांवर सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्स इतका खर्च केलेला आहे. अमेरिकेची ही शस्त्रास्त्रे इराणवर वापरताना आम्ही कचरणार नाही, असे सांगून ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा अमेरिकेवरील हल्ल्याच्या परिणामांची जाणीव करून दिली आहे. इराणमधील सांस्कृतिक ठिकाणे लक्ष्य करण्याची धमकी देऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धगुन्हा केल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी केला आहे. अमेरिकेने कितीही आकांडतांडव केले तरी पश्‍चिम आशियातून अमेरिकेचे घृणास्पद अस्तित्त्व संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे इराणचे परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले.

अमेरिका आणि इराण परस्परांना देत असलेल्या निर्वाणीच्या इशार्‍याचे परिणाम या क्षेत्रातील देशांवर दिसू लागले असून सर्वच देशांनी आपल्या सुरक्षेसाठी जलदगतीने हालचाली सुरू केल्या आहेत. कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, हे लक्षात घेऊन हे देश पूर्वतयारी करीत आहेत. तसेच अमेरिका आणि इराणमधल्या संघर्षाचे परिणाम सार्‍या जगाला भोगावे लागतील, असे जगभरातील सामरिक विश्‍लेषक बजावत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info